वरवेली ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

 

नळपाणी योजनेत जैन इरिगेशन कंपनीचे पाईप टाकण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम

गुहागर l प्रतिनिधी: जलजीवन मिशन अंतर्गत गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रां.प. कार्यक्षेत्रात चालू असलेल्या नळपाणी योजनेतील समस्यांबद्दल वरवेली ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, वरवेली ग्रा.प. कार्यक्षेत्रात सध्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. यापुर्वी ग्रामस्थांनी तत्कालीन गटविकास अधिकारी प्रशांत राऊत व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांची भेट घेवून वरील योजनेतर्गत जैन इरिगेशन कंपनीचे पाईप वापरण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या समक्ष भेटीमध्ये जैन इरिगेशन पाईप लाईन टाकण्याचे मान्य केलेले असून संबधित ठेकेदार यांना आणलेल्या शक्ती पॉलीमर कंपनी ऐवजी जैन ईरिगेशन कंपनीचे पाइप वापरण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार ठेकेदार याने जॅकवेलपासून साठवणूक टाकी पर्यंत जैन इरिगेशन कंपनीचे चार इंच साइजचे पाईप टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे.

तथापि आता नळ धारकांना पाणी पुरवठयाबाबत उपयोगात आणावयाचे पाईप लाईन शक्ती पॉलीमर या कंपनीची वापरावी लागेल असे सरपंच, ग्रा.पं. वरवेली यांनी सांगितले आहे. गावातील काही लाभधारकांनी पाणी टंचाई होऊ नये म्हणून नाइलाजास्तव शक्ती पॉलीमर कंपनीचे पाईप टाकण्यास संमत्ती दिलेली आहे. परंतु बहुतांश ग्रामस्थ या विरोधात असून आम्हाला जैन इरिगेएशन कंपनीचे पाईप याकामी हवे आहे. तशी आमची मागणी आहे. आपण संबधित ठेकेदार यांना सुचना देवुनही त्या आपल्या आदेशाचे भंग करुन शक्ती पॉलीमर या कंपनीचे पाईप वापरण्यात येत आहे. वरवेली ग्रा.पं. कडे वेळोवेळी याबाबतची मागणी करुनही ग्रा.पं. व ठेकेदार यांच्याकडून जैन इरिगेशन कंपनीचे पाईप टाकण्या संदर्भात सहकार्य मिळत नाही.

संबंधित ठेकेदारकडुन पाईप लाइन टाकण्याच्या वेळी नियमाप्रमाणे तीन फुट खोल पाईप टाकण्याच्या सुचना असूनही अनेक ठिकाणी पाईप कमी खोदाई करुन टाकण्यात आलेले आहे. तसेच मराठवाडी भागात रस्त्याशेजारी गटारातुन पाइपलाईन टाकण्यात आलेली आहे. तसेच शासनाच्या निधीतुन बांधण्यात आलेले गटारातील मधील भाग फोडून पाईपलाइन वरचेवर टाकण्यात आली आहे. त्यावर माती टाकून पाईपलाईन बुजविण्यात आलेली आहे.

संबंधित ठेकेदार यांना वारंवार सुचना देवुनही त्यांनी कधीही कामाच्या ठिकाणी व ग्रामसभेच्या ठिकाणी उपस्थित राहून नळपाणी धारकांच्या अडचणी व समस्या कधीही जाणून घेतलेल्या नाहीत. तरी वरील शासन योजनेची गावामध्ये चांगल्या प्रकारे कार्यवाही व्हावी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी दूर करून अंतर्गत लाईन करता जैन इरीगेशन कंपनीचे पाईप वापरण्याबाबत ठेकेदार यांना सक्त सुचना दयाव्यात, अशी मागणी केली आहे.