लांजा (प्रतिनिधी) तुमची घरी कोणीतरी वाट पाहत आहे याचे भान राखूनच वाहन चालवा, असे प्रतिपादन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी विभागाच्या मोटर वाहन निरीक्षक श्रीमती आरती देसाई यांनी लांजा येथे केले.
राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत लांजा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मोटर वाहन निरीक्षक श्रीमती आरती देसाई तसेच सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आनंद शिंदे ,लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के. आर. चव्हाण, बाबा मोटर ट्रेनिंग स्कूलचे संचालक एकनाथ उर्फ बाबा खेतल आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मोटर वाहन निरीक्षक आरती देसाई म्हणाल्या की, आपले वाहन चालवत असताना वाहन चालकांनी वेगावर मर्यादा, नियंत्रण असले पाहिजे. तसेच आपले मन देखील स्थिर ठेवले पाहिजे. जर आपल्याला लांबचा प्रवास करायचा असेल तर शक्यतो लवकर निघा आणि सुरक्षित पोहोचा. दुचाकीस्वारांनी प्रवास करताना शक्यतो हेल्मेटचा वापर करा आणि कोणतेही वाहन चालवत असताना आपले घरी कोणीतरी वाट पाहत आहे याचे भान ठेवा. आणि जबाबदारीने वाहन चालवा. आपल्या एका चुकीमुळे आपल्याबरोबरच दुसऱ्याच्या कुटुंबीयांचे देखील नुकसान होईल याची जाणीव ठेवा आणि वाहन सुरक्षितपणे चालवा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले .त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.











