सलग सातव्या वर्षी विविध उपक्रमांचा जल्लोष
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी– प्रतिवर्षाप्रमाणे सलग सातव्या वर्षी शिव- साम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाट तर्फे सोमवार तारीख १९ फेब्रुवारी २०२४ रोजी, फोंडाघाट एस.टी स्टँड येथे शिवजन्मोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांना उपस्थित राहून पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
यानिमित्ताने शिवरायांचा पवित्र टेहळणी किल्ला, शिवगड येथे पहाटे ५ वाजता शिवज्योत प्रज्वलित करून, तिचे सकाळी ८ वाजता मिरवणुकीने ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपारिक ऐतिहासिक पोशाखातील शिवप्रेमी ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम स्थळी आगमन होणार आहे. सकाळी १० वा. शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना आणि पूजन तसेच अभिवादन करण्यात येईल. यावेळी प्रमुख अतिथींचे स्वागत आणि सत्कार ! तसेच तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि ८ वाजता ओमकार कला मंच, सावंतवाडी, निर्मित कलाविष्कार, नृत्य, नाट्य, हास्यविनोद यासह गणेश जन्म ज्योतिबा व सप्तशृंगी दर्शन, शिवचरित्र महिमा हा विविधरंगी कार्यक्रम आणि कांतारा विशेष परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला आहे.अर्थात याप्रसंगी शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे उत्साही नेतृत्व,स्वर्गीय सचिन नाकाडी यांची उणीव मित्रमंडळींना जाणवणार आहे. कार्यक्रम नियोजनबद्ध आणि यशस्वी पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे मावळे कार्यरत आहेत.











