आदर्श मित्र मंडळ पश्चिम वणेवाडी संघ ठरला उपविजेता
संतोष कुळे l चिपळूण : मुंबई क्रीडा मंडळ बामनोली यांच्या वतीने चारकोप कांदिवली येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये जय हनुमान क्रिकेट क्लब ( बी) किजबिलेवाडी या संघाने प्रथम क्रमांक तर आदर्श मित्र मंडळ पश्चिम वणेवाडी संघाने स्पर्धेतील द्वितीय क्रमांक पटकावला.
मुंबई किडा मंडळ आयोजित या क्रिकेट स्पर्धेचे हे दुसरे पर्व होते. या दुसऱ्या पर्वा मध्ये एकूण बामणोली गावातील सतरा संघानी सहभाग घेतला होता . दोन दिवस मुंबई स्थित सर्व ग्रामस्थ आणि खेळाडू यांनी स्पर्धेचा आनंद घेतला . या स्पर्धेतील अंतिम सामना हा जय हनुमान क्रिकेट क्लब बी किजबिलेवाडी विरुद्ध आदर्श मित्र मंडळ पश्चिम वनेवाडी यांच्या दरम्यान झाला . या अटीतटीच्या सामन्यांमध्ये शेवटी जय हनुमान क्रिकेट क्लब किजबिलेवाडी या संघाने मुंबई क्रीडा मंडळाच्या दुसऱ्या पर्वातील क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर स्पर्धेतील उपविजेता संघ आदर्श मित्र मंडळ पश्चिम वणेवाडी संघ ठरला.
या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून परेश प्रकाश चांदिवडे, उत्कृष्ट फलंदाज संतोष हरिश्चंद्र शिगवण, आणि उत्कृष्ट गोलंदाज संतोष बाबुराव कापले यांना वैयक्तिक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विजेता आणि उपविजेत्या दोन्ही संघांना रोख पारितोषिक आणि चषक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाला ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी, मुंबई क्रीडा मंडळ बामनोलीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सर्व खेळाडू उपस्थित होते.
विजेत्या दोन्ही संघांना सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई क्रीडा मंडळ बामणोली येथील सर्व पदाधिाऱ्यांनीही आणि सदस्यांनी मेहनत घेतली.











