तळवली येथील श्री सोमनागेश्वराचा उद्यापासून महाशिवरात्र महोत्सव 

 

गुहागर (प्रतिनिधी):तालुक्यातील तळवली येथील स्वयंभू श्री सोमनागेश्वराचा दिनांक 7 मार्च पासून महाशिवरात्र महोत्सव विविध कार्यक्रमानी साजरा केला जाणार आहे.

येथील स्वयंभू श्री सोमनागेश्वर देवस्थान जागृत देवस्थान असून विविध ठिकाणाहून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जातो.यावेळीदेखील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी गुरुवार दिनांक 7 रोजी मंत्रोक्त पूजा,अभिषेक, सकाळी 10.30 ते दुपारी 2 वा. मोफत नेत्र तपासणी शिबिर,दुपारी 12 वा.आरती,सायंकाळी 6 ते 8 हरिपाठ, आरती त्यानंतर छबिना व सुस्वर भजने, शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी मंत्रोक्त पूजा,अभिषेक, सायंकाळी 4 ते 5 शिवलीलामृत वाचन,सायं.7 ते 9 सुश्राव्य कीर्तन,त्यानंतर आरती व छबिना तर शनिवार दिनांक 9 मार्च रोजी मंत्रोक्त पूजा,अभिषेक,दुपारी 12.30 ते 2 महाप्रसाद, रात्रौ 8 ते 9 आरती,छबिना व रात्रौ ठीक 10.30 वाजता श्री सोमनागेश्वर सेवा मंडळ तळवली व श्री सोमनागेश्वर नाट्य कलामंच तळवली आयोजित भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका पुरस्कृत तालुकास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा पार पडणार आहेत. तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वयंभू श्री सोमनागेश्वर देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.