खेड (प्रतिनिधी) व्हॉटस्अॅपवर व्हाईस कॉल करत मॉर्फ केलेल्या आक्षेपार्ह फोटो पाठवून व्हायरल करण्याच्या धमकीद्वारे ३० हजार रूपयांची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मेहजर अली इकबाल हुसैन (फतेहपूर- राजस्थान) यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता १२ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील एका व्यक्तीस संशयिताने व्हॉटस्अॅप व्हाईस कॉल करून आक्षेपार्ह फोटो फेसबुक अकाऊंटसह इतर मित्रांना पाठवणार असल्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तसे न करण्यासाठी त्याने १५८ हजार रूपये व पुन्हा १५ हजार रूपये असे ३० हजार रूपये गुगल-पेच्या माध्यमातून पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार संशयितावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तपासाला गती दिली. त्यानुसार पथकाच्या सहाय्याने राजस्थान येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने अन्य कोणास धमकी देवून फसवणूक केली आहे का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.












