मालवणी नटसम्राट अभिनेते दिगंबर नाईक यांचे प्रतिपादन
सावंतवाडी । प्रतिनिधी : माझं बालपण माझ्या आजोळीचं झालं. त्यामुळे आजही आजोळची ओढ नेहमी असते.आजोळचे प्रेम हे काही औरच असून आज आजोळच्या गावात माझा झालेला सत्कार हा माझ्या दृष्टीने लाखमोलाचा आहे, अशा शब्दांत मालवणी नटसम्राट अभिनेता दिगंबर नाईक यांनी कलंबिस्त येथे झालेल्या सत्काराला उत्तर देताना मनोमन आभार मानले.
कलंबिस्त हायस्कूलच्या मैदानावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व दीपक केसरकर मित्र मंडळाच्या सहकार्याने दिगंबर नाईक याचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर ‘ नाटक आयोजित करण्यात आले होते. यावेळी कलंबीस्त गावच्यावतीने व आमदार दीपक केसरकर मित्र मंडळातर्फे अभिनेते दिगंबर नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर दीपक केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, कलंबिस्त हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष शिवाजी सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी तालुकाप्रमुख नारायण राणे संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गजानन नाटेकर सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, सचिव यशवंत बाबा राऊळ, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जीवन लाड, विभाग प्रमुख विनायक सावंत, उपविभाग प्रमुख संजय पालकर, सरपंच मोहन राऊळ, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, ॲड. अमोल कविटकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष सावंत, मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे सहसचिव विनोद सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, सांगेली उपसरपंच संतोष नार्वेकर, अंतोन रोड्रिक्स, भाई सावंत आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना दिगंबर नाईक म्हणाले, माझ्या मामाचं गाव म्हणजेच माझं आजोळ सांगेली. त्यामुळे या सह्याद्री पट्ट्यातील पंचक्रोशीत माझे बालपण गेले. सांगेली कलंबिस्त या गावांबद्दल ओढ माझ्या मनात कायम घर करून आहे. या भागात मी खूप काही शिकलो. त्यामुळेच अभिनय क्षेत्रात मी वेगळी उंची गाठू शकलो आणि त्याच माझ्या आजोळी भागातील लोकांच्या समोर एवढा मोठा गौरव होत आहे तोच खरा माझा सन्मान आहे हा सन्मान मला लाख मोलाचा वाटतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे म्हणाले, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे या सह्याद्री पट्ट्यातील गावांवर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच त्यांनी या भागातील लोकांना एक सांस्कृतिक चळवळ व्यापकपणे पुढे जावी यासाठी त्यांनी नाट्य रसिकांसाठीही मेजवानी दिली आहे. मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनीही शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन किशोर वालावलकर तर आभार संतोष सावंत यांनी मानले. ब्रँड ॲम्बेसडर या नाटकात कोकणातील आणि विशेषता देवगड कणकवली सावंतवाडी या भागातील नाट्य कलाकारांचाच भरणा असून यातील कलाकार नयन जाधव, संदेश तेली, संदीप कांबळे, अनिल शिंदे, नितीन घाणेकर, उमा शंकर पाटील, श्रद्धा मोहिते या कलाकारांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.











