रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील बेरोजगारीच्या पापाचा धनी विनायक राऊतच : प्रमोद जठार

तंटे लावणारा व प्रकल्प होऊ न देणारा खासदार नको : खासदार बदला नशीब बदलेल

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाच उमेदवारी द्यावी ही आमची प्रमुख मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : उद्धव ठाकरेंकडे २०१४ साली विनायक राऊत यांच्या नावाची शिफारस करून त्यांना निवडून आणण्याचे कामदेखील मीच केले होते. मात्र, त्याचा आज आम्हाला पश्चाताप होत आहे. कारण विकास करणे सोडाच उलट या मतदारसंघात होऊ घातलेल्या रोजगाराभिमुख प्रकल्पांना विरोध करण्याचेच एकमेव काम विनायक राऊत यांनी केले. सी वर्ड सारखा जागतिक पर्यटन प्रकल्प तसेच नाणारचा रिफायनरी प्रकल्प झाला असता तर जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना नोकरी मिळाली असती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगारीच्या पापाचा धनी विनायक राऊतच असून खासदार बदला नशीब बदलेल, असे आवाहन भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ प्रमुख प्रमोद जठार यांनी केले.
दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी मागील दहा वर्षात टॉवर उभे करण्यापलिकडे काहीच काम केले नाही. त्यामुळे आम्हाला आता विकास करणारा खासदार हवा असून झगडे लावणारा व प्रकल्प होऊन न देणारा खासदार नको. महायुतीकडून दोन दिवसात उमेदवाराचे नाव निश्चित होणार असून आमचा उमेदवार हा विकास करणाराच असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली, जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश सारंग, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, किसान मोर्चा जिल्हा  चिटणीस अजय सावंत, विनोद सावंत आदी उपस्थित होते.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचा महायुतीचा उमेदवार येत्या दोन दिवसात जाहीर होईल. दातृत्व नेतृत्व कर्तुत्व व वक्तृत्व असलेला उमेदवार महायुती देणार आहे. भाजपाकडून कमळ चिन्हावरच उमेदवार दिला जावा असा आग्रह आजही आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून धनुष्यबाणाचा उमेदवार दिला जावा अशी भूमिका आहे. मात्र, दोन्ही बाजूंचा विचार करून वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्राचे ५० लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. मात्र त्या बजेट मधील किती पैसा खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी आणला असा सवाल उपस्थित करीत त्यांनी केवळ बीएसएनएलचे टॉवर उभे करण्यापलीकडे काहीच केलेलं नाही. खरंतर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बेरोजगार असल्याने येथे रोजगार देणाऱ्या प्रकल्पांसाठी निधी आणण्याची गरज होती. मात्र, या उलट त्यांनी केवळ रिफायनरी, सी वर्ल्ड यासारख्या रोजगाराभिमुख प्रकल्पांना विरोध करण्याचे विरोध करण्याचे काम केले. हे प्रकल्प झाले असते तर येथील तरुणांना गोवा येथे रोजगारासाठी जायची आवश्यकता लागली नसती व होणारे अपघातही टळले असते. त्यामुळे या अपघातांना व बेरोजगारीला खासदार विनायक राऊतच जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

जामनगर येथे अंबानी कुटुंबीयांची ऑइल रिफायनरी आहे. त्या ठिकाणी अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहकुटुंब सहभागी होणे ठाकरेंना चालतं. तेथे प्रदूषण दिसले नाही. ते जर चालत असेल तर कोकणातील ऑइल रिफायनरीला यांचा विरोध का असा सवालही प्रमोद जठार यांनी उपस्थित केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाच उमेदवारी द्यावी ही आमची प्रमुख मागणी : प्रमोद जठार

सिंधुदुर्ग रत्नागिरी हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गड आहे. गेल्या अनेक वर्षात मंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते व आता केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांनी या भागाचा मोठा विकास केला आहे. केंद्रातील अनेक प्रकल्पही त्यांनी मंजूर केले आहेत. त्यामुळे यावेळी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांनाच मिळावी ही आमची भाजप म्हणून पहिली पसंती आहे. तशा प्रकारची मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली आहे, अशी माहिती ही यावेळी लोकसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.