श्री धुतपापेश्वरची होळी पाहण्यासाठी राजापूरात भाविकांची लोटली गर्दी

राजापूर जवाहरचौक येथे श्री देव धुतपापेश्वरची होळी खेळविताना भाविक.

राजापूर | वार्ताहर : राजापूर शहर आणि तालुक्यात शनिवार पासून शिमगोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शिमगोत्सवाचे महत्वाचे अंग असलेल्या सायंबाच्या होळीने शिमगोत्सवाची धडाक्यात सुरूवात झाली आहे. राजापूरवासियांचे आराध्य दैवत असलेल्या धोपेश्वर येथील श्री देव धुतापेश्वर आणि श्री नवलादेवी शिमगोत्सवाला सुरूवात झाली असून पुर्वापार प्रथेप्रमाणे पाच वर्षांनतर श्री देव धुतपापेश्वर होळी राजापूर शहरात खेळविण्यात आली. जवाहरचौक येथे ही होळी खेळवितानाचे दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

राजापूरवासियांचे आराध्य दैवत असलेल्या धोपेश्वर येथील श्री देव धुतपापेश्वराची होळी पाच वर्षानी राजापूर शहरात आणुन नाचवली जाते. दर पाच वर्षानी श्री देव धुतपापेश्वराची होळी पुढची सलग दोन वर्ष राजापूर शहरात आणली जाते. गेल्या अनेक वर्षापासुन हा रिवाज आहे. त्याप्रमाणे शनिवारी ही होळी तोडून मिरवणुकीने धोपेश्वर गावातून धोपेश्वरघाटी मार्गे जवाहर चौकात आणण्यात आली.

होळी समवेत अग्रभागी बैलगाडी, श्री देव धुतपापेश्वरचे निशाण, पाहेरीकरी असा पारंपारीक साज, ढोलताशांच्या गजरात फाका देत होळी जवाहरचौक येथे आणण्यात आली. या ठिकाणी होळी खेळविण्यासाठी तरूणांनी एकच गर्दी केली होती. सुरमाडाची ही होळी जवाहरचौक येथे खेळवितानाचे दृश्य फारच विलोभनीय होते. तरूण मोठया उत्साहाने होळीचा आनंद घेताना पाहायला मिळत होते.

जवाहरचौक येथुन मुख्य बाजारपेठ अभ्यंकर गिरणीच्या बोळातून पुढे बंदरधक्का गुजराळी मार्गे ही होळी धोपेश्वरकडे रवाना झाली. पाच वर्षाच्या कालावधीनंतर धुतपापेश्वरची होळी शहरात आल्याने होळी खेळवितानाचे दृश्य पाहण्यासाठी धोपेश्वर गावातील बारा वाडयातील मानकरी तसेच ग्रामस्थ तसेच राजापूर शहर आणि परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी उशीरा ही होळी मिरवणुकीने श्री देव धुतपापेश्वर मंदिर येथे आणली जाते व विधीवत पूजा करून उभी केली जाते. यानंतरच खऱ्या अर्थाने शिमगोत्सवाची सुरूवात होवून बहर येणार आहे.