राजापूर (वार्ताहर): चैत्र शु.प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे राजापूरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शोभायात्रा काढून स्वागत करण्यात आले.
या शोभायात्रेत बहुसंख्य नागरिक पारंपारिक वेषात सहभागी झाले होते.
ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथुन या यात्रेचा शुभारंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन होऊन राजेंद्र कुशे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या यात्रेचा प्रारंभ झाला. मुख्य रस्ता, जवाहरचौक, शिवस्मारक, संभाजीपेठ, मधीलवाडा, गणेशघाट, शिवाजीपथ मार्गे जवाहरचौक अशी ही शोभायात्रा काढण्यात आली. स्वागत यात्रा जवाहरचौक शिवस्मारकाजवळ आल्यावर स्वागतयात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र कुशे, शिवस्मृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते शिवपुतळयाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या शोभायात्रेत मुलींच्या लेझीम पथकाने सहभागी होत उत्सवी रंग भरले. याशिवाय काही नागरिकांनी पारंपारिक वेषभुषा सादर करत शोभायात्रेची शोभा वाढविली. श्री देव चव्हाटा मंदिर येथे महाआरतीने यात्रेची सांगता झाली.










