खेडमधील विहाळी गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील विहाळी येथे राष्ट्रीय पेयजल व जलजीवन मिशन योजनेच्या पाण्याच्या साठवण टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला समोर जावे लागते, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. गावकऱ्यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने त्याची गंभीर दखल घेवून ठेकेदाराकडून त्याच ठिकाणी नवीन साठवण टाकी बांधून दिली आहे. यामुळे ग्रामस्थांची पाण्याची चिंता अखेर मिटली आहे.
२०२०-२१ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून २ लाखांचा निधी खर्चुन पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाकीचे व त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत २०२२मध्ये १६ लाखांचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र राष्ट्रीय पेयजल योजनेतून बांधलेल्या साठवण टाकीला गळती लागून टाकीचे काम निकृष्ट ठरले, असा आरोप गावकऱ्यांचा आहे.
याबाबतचा सारा पाढा ग्रामस्थांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर वाचला असता कामाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्यात आली. यात साठवण टाकी निष्काशीत करून पुन्हा त्याच ठिकाणी नवीन साठवण टाकी स्वखर्चाने बांधण्याचे आदेश संबंधिताला देण्यात आले. नवीन टाकी बांधून न दिल्यास कारवाईची तंबीही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती.