नैसर्गिक आपत्ती निवारण आढावा बैठका ठरताहेत केवळ फार्स
ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये २४ तासांपेक्षा अधिक काळ विज नाही
विज आपत्ती ओढवूनही २४ तासात सुधारणा नाही
जनता त्रस्त प्रशासन सुस्त, लोकप्रतिनिधी सुशेगात
तीव्र उकाडयाने जनता त्रस्त
राजापूर (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसात वाढलेल्या उष्ण तापमानामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना गेले तीन ते चार दिवस पडणाऱ्या मान्सूनपुर्व पावसाने काहिसा दिलासा दिला आहे. मात्र या मान्सून पुर्व पावसाच्या सुरूवातीलाच नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी ‘सज्ज’च्या फुशारक्या मारणाऱ्या प्रशासनाच्या कार्यकक्षा उघड झाल्या आहेत. या मान्सूनपुर्व पावसात गेले तीन ते चार दिवस तालुक्यातील विजसेवा पुर्णपणे कोलमडली असून वारंवार खंडीत होणाऱ्या विजपुरवठयामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. तर तालुक्यात अनेक भागात १८ ते २४ तास उलटून गेले तरी विजपुरवठा सुरू झालेला नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुर्वी प्रशासनाच्या प्रमुखांनी विविध विभागांच्या घेतलेल्या आढावा बैठका हा केवळ ‘फार्स’ ठरल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतुन व्यक्त होत आहेत.
तर प्रशासनाने निर्माण केलेल्या नैसर्गिक आपत्ती निवारण व्हॉटसअॅप ग्रुपवर याबाबत तक्रारी करूनही अधिकारी वर्गाकडून कोणतीच कार्यवाही वा उत्तर दिले जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजापूर तालुक्यात ओढवलेल्या या आपतकालीन परिस्थित प्रशासन सुस्त आणि जनता त्रस्त अशी सध्या अवस्था असुन जनतेचे आम्हीच कैवारी अशा बढाया मारणारे लोकप्रतिनिधी यावर मुग गिळून गप्प आहेत. त्यामुळे आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख जिल्हाधिकारी यांनी याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी व राजापूरकरांना न्याय द्यावा अशी मागणी जनतेतुन होत आहे.
राजापूर तालुक्यात गेली तीन ते चर दिवस सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र या पावसात वारंवार खंडीत होणाऱ्या विजपुरवठयामुळे सर्वसामान्य जनता पुरती त्रस्त झाली आहे. दरवर्षी ही परिस्थिती ओढवत असतानाही पावसाळयापुर्वी महावितरण कडून योग्य ती खबरदारी न घेतली गेल्यानेच ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप जनतेतुन होत आहे. तालुक्यात मिठगवाणे, अणसुरे, जैतापूर, नेरकेवाडी, पाचल, वडदहसोळ, चुनाकोळवण, सागवे, धाऊलवल्ली, शीळ यांसारख्या भागात अनेक वेळा विजपुरवठा खंडीत होत असून तासंतास विज येत नाही अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. अनेक भागात २४ तासापेक्षा अधिक काळ विजपुरवठा खंडीत आहे. सायंकाळी ढग जमून वातावरणात तिव्र उकाडा निर्माण होत आहे. त्यात रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरू असल्याने उकाडयाने जनतेचा जीव कासावीस होत असल्याची स्थीती आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र अपुऱ्या बळामुळे महावितरणलाही कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अशा कालावधीत वाढीव कर्मचारी ठेवणे आवश्यक आहे. तर देखभाल दुरूस्तीची कामे यापुर्वीच करणे आवश्यक आहे. गेले काही दिवस सातत्याने या तक्रारी येत असूनही याबाबत दखल घेतली जात नाही अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या बाबत महावितरणने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्ती निवारण व्हॉटसअॅप ग्रुपवर पाऊस येतो, विज जाते असे का होते असे माहिती पत्रक टाकून समस्या सुटणार नाही त्यासाठी ठोस उपाययोजनेची आवश्यकता आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी चांगले काम करतात व करत आहेत यात कुणाचेही दुमत नाही, पण नियमित विजबील भरून सेवा घेणाऱ्या ग्राहकांना चांगली अखंडीत विज सेवा देण्याची जबाबदारी महावितरणची आहे ही बाब देखील तेवढीच महत्वाची आहे.
स्थानिक पातळीवरून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक असतानाही तसे होताना दिसत नाही. आढवा बैठकांमध्ये होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी होते का याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या अधिकाऱ्यांना कुणी जुमानत नाही की जनतेच्या प्रश्नाशी अधिकाऱ्यांना देणं घेणं नाही असे सवाल जनतेतुन उपस्थित केले जात आहेत.
मान्सूनपुर्व पावसात ही परिस्थिती असेल तर मग प्रत्यक्षात मान्सून सक्रिय होईल तेव्हा तालुक्यात काय होईल विजआणीबाणीची परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना? आणि मग यातुन जनतेत उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण? राजापूर तालुक्यात निर्माण झालेल्या या प्रश्नाची जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावी अशी मागणी होत असून शुक्रवारी एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे.
——————————————————————————————————











