वैभववाडी | प्रतिनिधी :
भुईबावडा पंचक्रोशीत गेले १५ दिवस विजेचा लपंडावं सुरु आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका वीज ग्राहकांना बसत आहे. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसापासून भुईबावाडा पंचक्रोशीतील मांगवली, आखवणे भोम पुनर्वसन, तिरवडे, ऐनारी, हेत, आखवणे, भोम, मोंदे, उपळे परिसरात दिवसभर सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे घरातील टी. व्ही., फ्रीझ, कॉम्पुटर, लॅपटॉप सारखी उपकारणे नादुरुस्त होत आहेत. तर अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनावर त्याचा परिणाम होत असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
त्याचप्रमाणे भुईबावडा येते बँक, दवाखाना,व शासकीय कामासाठी येणाऱ्या पंचक्रोशीतील नागरिकांना वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे कामासाठी तासंतास ताटकळतं राहावे लागत आहे. याबाबत नागरिकांकडून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही वीज वितरणच्या कारभारात सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
वीज वितरण कंपनीकडून पावसाळ्यापूर्वी वीज वाहिन्यावरील झाडे तोडणे, खराब वीज वाहिन्या, पोल बदलणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व वीज खांबावर झाडी आलेली आहे. तर अनेक ठिकाणी वीज खांब खराब झालेले आहेत. याकडे संबधीताकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात अडचण येत आहे. सर्व समस्या, अडचणी तात्काळ दुर कराव्यात अशी मागणी केली जात आहे.










