सकल मराठा समाजाच्यावतीने दहावी बारावीतील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
आई वडीलांची मेहनत सदैव स्मरणात ठेवा
सावंतवाडी । प्रतिनिधी : आजचं जग हे स्पर्धेचं जग आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या विविधांगी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून कौशल्य गुण दाखवून प्रगती साधायला हवी. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सतत कार्यरत रहा मात्र आपल्या कतृत्वाने जगासमोर आपली ओळख निर्माण करून देताना नेहमीच आई वडीलांची मेहनत सदैव स्मरणात ठेवा, असे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी केले.

सावंतवाडीत सकल मराठा समाजाच्यावतीने दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या महादेव भाटले स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, युवराज लखमराजे भोसले, भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष उद्योजक विशाल परब, सकल मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, भोसले इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य गजानन भोसले, माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, विलास जाधव, राघोजी सावंत , माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत आदी उपस्थित होते.
निलेश राणे म्हणाले, आमचे नेते नारायण राणे यांनी मराठा समाजाला ज्या प्रमाणात आरक्षण दिलं होतं तेच आजही सुरू आहे. त्यांनी मराठा समाजाला एकत्र करून मराठा आरक्षणावर भूमिका मांडली त्याला आज दहा वर्षे उलटली. मराठा समाजाची बाजू घेणे, आंदोलनं करणं आणि समाजासाठी काम करत राहणं हे साधं नाही. सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे आपलं कार्य प्रमाणिकपणे करत असून समाजासाठी सतत कार्यरत राहून समजूतदार पणे भूमिका मांडत आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या नेहमीच पाठीशी राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना समाजाच्या लढ्याबाबत माहिती हवी. शिक्षण घेत असतानाच सामाजिक जाणीव देखील तेवढीच महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना काय बनायचे तसं स्वातंत्र्य द्या. शिक्षणाची विविध दालने खुली झाली आहेत त्यामाध्यमातून कौशल्य दाखवा. जगाच्या स्पर्धेत विद्यार्थी उभा राहिला पाहिजे. आयुष्यात पैसा महत्वाचा आहे. पण तो उभा करण्यासाठी कौशल्य गुणांचा उपयोग केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
थोरामोठ्यांची चरित्रे वाचा आणि जीवनमूल्ये निर्माण करा. माझ्या आयुष्यात दोन वेळा माझा पराभव झाला तरी मी डगमगलो नाही. तर त्यानंतरही दिवस-रात्र राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून स्वंतत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तुम्हीही भविष्यात ज्या क्षेत्रात असाल तिथे प्रामाणिकपणे काम करा. आपल्या आई वडिलांची मेहनत फुकट घालवू देऊ नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या यशाचा गुणगौरव सोहळा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांना आपल्या समाजाचा इतिहास माहीत पाहिजे. इतिहास अभ्यासतो तो जीवनात यशस्वी होतो. तर युवराज लखमराजे भोसले म्हणाले, दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील काळात स्पर्धा परीक्षात सहभाग घेतील. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवून विविध क्षेत्रात विद्यार्थी चमकतील. शैक्षणिक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब म्हणाले, विद्यार्थ्यांना यशाबद्दल शुभेच्छा देतानाच तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये सतत कार्यरत रहा, असे सांगितले.
यावेळी माजगाव सरपंच सौ. अर्चना सावंत, राघोजी सावंत, माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर, यशवंत आमोणकर, सुंदर सावंत ,सौ संयुक्ता गावडे ,तारकेश सावंत, साईश गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले. तर सुत्रसंचलन पत्रकार जय भोसले यांनी केले.












