चिपळूण : अल्पावधीतच शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रकल्पातर्फे हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिनी कृषी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळावा १ जुलैला सकाळी १०.३० वा. बहादूरशेखनाका येथील सहकार भवनात होणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली.
कोकणातील शेतकरी शेतीपूरक दुग्ध व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे अशी धारणा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांची होती. यानुसार चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुमारे दोन वर्षांपूर्वी पिंपळीखुर्द येथे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि काही महिन्यातच हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत रूजू झाला. आता वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कनिष्ठ मृद शास्त्रज्ञ डॉ. पी. जी. आहिरे, भाजीपाला विशेषज्ञ डॉ. पी. बी. सानप, चिपळूण तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर कृषीविषयक माहिती देणार आहेत. शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे केले आहे.











