राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे 30 जून (Chief Secretary Sujata Saunik) रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळाल्या आहेत. एक जुलै रोजी त्या मुख्य सचिव पदाचे सूत्रे हाती घेतील.
मुख्य सचिव नितीन करीर यांनी 1 जानेवारी 2024 रोजी मुख्य सचिव पदाची सूत्रे हाती घेतली. ते 31 मार्च 2024 रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. दरम्यान राज्य सरकारने नितीन करीर यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दिलेला नव्हता. राज्य सरकारने मुख्य सचिव पदासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला होता.
मात्र हा प्रस्ताव आयोगाने फेटाळला. तसेच तीन अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्याचे निर्देश राज्याला दिले. त्यानुसार राज्य सरकारने सुजाता सैनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंग चहल आणि महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांची शिफारस केली. या तीनही नावांचा विचार न करता आयोगाने नितीन करीर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली.
सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक हे देखील राज्याचे मुख्य सचिव राहिले आहेत. ते 31 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. सध्या ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आहेत. त्याच्यानंतर सुजाता सौनिक यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यावेळी नितीन करीर यांची वर्णी लागली.










