पर्यटन व्यवसायिकांच्या वायरी येथील बैठकीत निर्णय
मालवण | प्रतिनिधी : सीआरझेड तसेच बिनशेती साऱ्याच्या दंडा मुळे किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. पर्यटन जिल्हा असूनही महसुली उद्देश साध्य करण्यासाठी येथील न्याहारी निवास धारकांना नाहक त्रास दिला आहे. प्रशासन स्तरावर आपली भुमिका मांडण्यासाठी सोमवारी मालवण तहसील कार्यालयाला धडक देण्याचा निर्णय पर्यटन व्यवसायिकांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे महसुली अधिनियम १९६४ चे कलम १७४ मध्ये अंशतः बदलाची गरज असून यावर पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून निर्णय घेतला जावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
वायरी भूतनाथ येथील नम्रता निवास येथे तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांची बैठक संपन्न झाली. यावेळी पर्यटन विकास महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, देवानंद लोकेगावकर, मिलिंद झाड, मनोज खोबरेकर, रवींद्र खानविलकर, केदार झाड, राम चोपडेकर, अभय पाटकर, गणेश माडये, मीठबावकर यांसह मोठ्या संख्येने पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते.
सीआरझेड आणि अकृषिक शेत सारा वसुलीच्या नियमांमध्ये शिथिलता येणे आवश्यक आहे. सिंधुदुर्गात किनारपट्टीवर पर्यटन व्यवसाय वाढत आहे. याठिकाणी पर्यटन व्यवसायास अनेक संधी आहेत. मात्र काही महसुली अधिनियमानमुळे पर्यटन व्यवसाय करताना अडचणी येत आहेत.
कित्तेक पर्यटन व्यवसायिकांना बिनशेती सारा आणि त्याच्या भरमसाठ दंडाच्या वसुली साठी महसूल विभागा कडून दंडाच्या नोटिसा बजावल्या जात आहे. महसुली कारवाईची टांगती तलवार डोक्यावर घेवून पर्यटन व्यवसाय करावा लागत आहे. चालू पावसाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणली जावी आणि त्यावर तोडगा निघावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
तहसील कार्यालयाला धडक….
मिळकतीचा बिनशेती वापर होत असल्याच्या कारणास्तव महसूल विभागाकडून पर्यटन व्यावसायिकांना बिनशेती सारा व त्याच्या दंडाची वसुली करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकांना होणारा नाहक त्रास शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सोमवारी मालवण तहसील कार्यालयाला पर्यटन व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने धडक देण्याच्या निर्णय घेतला असल्याचे पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर म्हणाले.
सीआरझेड दंडाच्या नोटीस, पाणी, लाईट, कचरा नियोजन या विषयावर सकारामत्क चर्चा झाली. सोमवारी सकाळी ११ वाजता तहसील ऑफिस मालवण येथे महसुली दंडाच्या नोटीस संदर्भात चर्चा आणि निवेदन देण्याचे ठरले असून सर्व व्यवसाईक मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन देवानंद लोकेगावकर यांनी केले आहे.












