खरीप हंगामात पीक विमा योजनेत सहभागी व्हा! जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांचे आवाहन

मसुरे | झुंजार पेडणेकर : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतक-यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता प्रधानमंत्री पीक योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतक-यांना पेरणी न होणे तसेच पुर. दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे. खरीप हंगामामध्ये कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी या पिकांकरीता पीक विमा उतरविता येईल. शेतकरी हिस्स्याची विमा हप्त्या रक्कम रु. १/- वजा जाता राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतक यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे, घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल.

 

सिंधुदुर्ग जिल्यातील भात पिकाकरीता अधिसूचित असलेल्या ५७ महसूल मंडळांमध्ये, नाचणी पिकाकरीता अधिसूचित ५२ महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. खरीप हंगाम २०२४ करीता योजनेत सहभागाची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ अशी आहे. फक्त आता आठ दिवस शिल्लक असून जास्तीत जास्त शेतकऱ्यानी योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री विजयकुमार राऊत यांनी केले आहे.