चिपळूण (प्रतिनिधी)-— : डेरवण येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात नुकत्याच अॅम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व महाराष्ट्र लगोरी संघटनेच्या वतीने आठव्या ज्युनिअर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात पार पडली. या स्पर्धेत भारतातील २१ राज्यातून १८ मुलांचे व २० मुलींचे संघ अशा एकूण ६२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्टचे पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ.आर. एच. देशपांडे यांच्या हस्ते लगोरी फोडून करण्यात आले. यावेळी लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संदीप गुरव, एसव्हीजेसीटी क्रीडासंकुलाचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, लगोरी संघटनेचे पदाधिकारी अॅड. प्रिया गुरव, तुषार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. तसेच सहभागी राज्यातील संघांनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली व खेळाडूंनी शपथ घेऊन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धेत मुलांच्या गटात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात गोवा संघाने विजेतेपद पटकावले तर महाराष्ट्र संघ उपविजेते पदाचा मानकरी ठरला. बिहार व झारखंड संघाने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार हरियाणा मधील अमन कुमार या खेळाडूला देऊन गौरविण्यात आले.
मुलींमध्ये झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये हरियाणा संघ सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपदाचा मानकरी संघ ठरला तर उपविजेतेपद गोवा संघाने मिळविले. तसेच तृतीय स्थान बिहार व उत्तराखंड संघाने पटकावले. मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बिहार मधील काजल या खेळाडूला गौरविण्यात आले.
याचबरोबर टार्गेट टीम लगोरी प्रकारात अरुणाचल प्रदेश विरुद्ध तामिळनाडू यांच्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात अरुणाचल प्रदेश संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम चषकावर नाव कोरले. तर तृतीय स्थान पॉंडिचेरी संघाने पटकावला. मिक्स डबल क्रीडा प्रकारात झालेल्या अंतिम सामन्यात कर्नाटक संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद तर आसाम संघाने उपविजेतेपद पटकावले. दिल्ली संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण मुख्य अतिथी म्हणून श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त विकास वालावलकर ह्यांच्या उपस्थितीत व भारतीय लगोरी संघटनेचे पदाधिकारी, बिहार लगोरी संघटनेचे रणदीर कुमार, हरियाणाचे सचिव जयवीर दुडी, आसामचे सचिव रितू ,अरुणाचलप्रदेशचे सॅनडी चॅरी व सहभागी सर्वं राज्यांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
विकास वालावलकर यांनी आपल्या भाषणात म्हणाले कि, हि भव्य दिव्य राष्ट्रीय लगोरी स्पर्धा बघून व एवढे भारतभरातील सहभागी २१ राज्ये बघून मी पूर्ण भाराहून गेलो. मी हि लहानपणी हा खेळ खेळायचो आज हा खेळ संपूर्ण भारतात खेळला जातोय याचे कौतुक आणि आश्चर्य वाटत आहे, लगोरी हा खेळ शारीरिक संतुलन अबाधित राखण्यासाठी सर्वोत्तम असा नक्कीच आहे. मात्र, आजची पिढी संगणक आणि मोबाईलच्या खेळात गुरफटत चालली असल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे. आताच्या संगणकीय युगात अनेक पारंपारिक खेळ नामशेष होत चालले असताना लगोरी सारख्या देशी खेळाला कै. संतोष गुरव यांनी संजीवनी देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पुन्हा कधीही आपण लगोरीच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धा येथे घ्या आम्ही आपणांस आमच्या ट्रस्ट च्या वतीने सर्वोतपरी सहकार्य करू अशी ग्वाही संदीप गुरव यांना दिली.










