प्रशांत यादव मित्र मंडळ आयोजित ‘अभंगवाणी’ बहारदार कार्यक्रमात श्रोते झाले मंत्रमुग्ध!

 

 

 

 

 

*चिपळूण (संतोष सावर्डेकर):-* जय जय राम कृष्ण हरी…, इवलेसे रोप लवियेले द्वारी…, माझें माहेर पंढरी…, हरि आला रे हरि आलारे…, यासारख्या एकापेक्षा एक सरस अशा अभंगांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते, आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला प्रशांत यादव मित्र मंडळ आयोजित अभंगवाणी कार्यक्रमाच्या आयोजनाचे. गायक वरद केळकर यांनी ‘राम कृष्ण हरी’ अभंग सादर करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यानंतर गायिका स्मिता करंदीकर, तन्वी मोरे, गायक अभिषेक सुतार यांनी एकाहून एक सादर केलेल्या अभंगांनी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

 

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनाच्या सहकार सभागृहात प्रशांत यादव मित्र मंडळ आयोजित ‘अभंगवाणी’ कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलानाने झाली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक व चिपळूण नागरी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, चिपळूण नागरीच्या संचालिका ऍड. नयना पवार, सौ. रुपाली कदम, शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख शशिकांत मोदी, जेष्ठ पत्रकार सतीश कदम, दादा खातू, श्री. कानडे यांनी दीपप्रज्वलन केले.

 

यानंतर प्रास्ताविकात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी हजारो वर्षाची परंपरा असलेला आपला हा आषाढीचा उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्ताने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येपर्यंत सगळ्या तमाम पालख्या आणि त्यांच्याबरोबर असलेले वारकरी पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत. सगळी पंढरपूर नगरी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी सज्ज झालेली आपण सगळेजण पाहतो आहे. ही परंपरा वारकरी संप्रदायाची, महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने वैभव आहे आणि हे वैभव जपणारे सगळे तमाम वारकरी पंढरपुरात आहेत आणि या सगळ्या वारकऱ्यांना यानिमित्ताने आपणही त्यांच्यासमवेत सामील होण्यासाठी ‘अभंगवाणी’ बहारदार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याचे यादव यांनी यावेळी सांगितले.

 

यानंतर गायक वरद केळकर यांनी ‘राम कृष्ण हरी’ या अभंगाने कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि श्रोते तंत्रमुग्ध होण्यास सुरुवात झाली. यानंतर गायक आणि एकापेक्षा एक सरस असे अभंग सादर करून श्रोत्यांना खिळवून ठेवले. तर श्रोत्यांनी प्रत्येक अभंगाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत मैफलीचा आनंद लुटला.

 

गायिका तन्वी मोरे यांनी

इवलेसे रोप लावियेले द्वारी |

त्याचा वेलू गेला गगनावरी ||

हा पूर्ण अभंग तर ज्येष्ठ गायिका सौ. स्वाती करंदीकर यांनी

हरि आला रे हरि आलारे ।

संतसंगें ब्रह्मांनंदु जालारे ॥ध्रु०॥

हा देखील पूर्ण अभंग याचबरोबर गायक अभिषेक सुतार यांनी

विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो.. विठ्ठल नामाचा रे टाहो

प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेमे भाव || धृ ||

 

 

माझें माहेर पंढरी आहे!

आहे भिवरेच्या तीरी!!१!!

असे पूर्ण अभंग सादर करून श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या.

 

पुन्हा गायक वरद केळकर यांनी

वेदांनाही नाही कळला अंतपार याचा।कानडा राजा पंढरीचा।।

निराकार तो निर्गुण ईश्वर। कसा प्रकटला असा विटेवर।

उभय ठेविले हांत कटीवर। पुतळा चैतन्याचा।।१।। हा पूर्ण अभंग लयबद्ध संगीताने गाऊन सर्वच गायकांनी एकापेक्षा एक अभंग गात श्रोत्यांची दाद मिळवली. तर चिपळूणमधील नवोदित गायिका कु. स्वरा यादव हिला अभंग गाण्याची संधी देण्यात आली. शेवटी विठू नामाचा गजर करीत बहारदार ‘अभंगवाणी’ कार्यक्रमाची सांगता झाली.

 

या गायकांना संतोष आठवले (ऑर्गन ), निखिल रानडे (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज), सुहास सोहनी ( तालवाद्य) यांनी सुरेख सात संगत केली तर वामन जोग यांनी उत्तम निवेदन सादर करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली. या कार्यक्रमाचे सुत्रधार श्रीनिवास जोशी होते.

 

यावेळी चिपळूण नागरीचे संचालक सत्यवान मामुनकर, सोमा गुडेकर, राजेश वाजे, रवींद्र भोसले यांच्यासह वैभव चव्हाण, सौ. राधा शिंदे, सौ. सुप्रिया उतेकर, सुनील कानडे, भोसले डॉ. सुनील सावंत आदी उपस्थित होते.

 

तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत यादव मित्र मंडळाने विशेष मेहनत घेतली.

 

*चौकट*

 

प्रशांत यादव मित्र मंडळ आयोजित अभंगवाणी कार्यक्रमात ज्येष्ठ नटकर्मी भाऊ कार्ले यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच युवा वारकरी मंडळ, निरबाडे या वारकरी मंडळाला टाळ मृदंग देऊन सन्मानित करण्यात आले.