राजापूर शहर बाजारपेठेतील जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

गुरूवारी एका धोकादायक इमारतीचा भाग अचानक कोसळला,

सुदैवाने जीवीतहानी टळली

राजापूर (वार्ताहर): राजापूर शहर बाजारपेठेतील मालपेकर ज्वेलर्स गल्लीतील धोकादायक इमारतीचा काही भाग गुरूवारी रस्त्यावर कोसळला. सुदैवाने यावेळी रस्त्यावर फारशी रहदारी नसल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या घटनेनंतर या इमारतीचा धोकादायक भाग नगरपरिषदेने जेसीबीच्या सहाय्याने हटविला आहे. मात्र या घटनेने शहर बाजारपेठेतील जून्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

गुरूवारी राजापूरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामध्ये शहर बाजारपेठेतील मालपेकर ज्वेलर्स दुकानाच्या लगत असलेल्या जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीचा काही भाग रस्त्यावर कोसळला. याबाबत नगरपरिषद प्रशासनाला माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी जात रस्त्यावर पडलेला भाग हटविला. तसेच या इमारतीचा अन्य काही भाग देखील कोसळण्याच्या स्थितीत असल्याने जेसीबीच्या सहाय्याने हा धोकादायक भाग हटविण्यात आला. दरम्यान शहरातील गुरूवारचा आठवडा बंदर धक्का परिसरात भरत असल्याने गुरूवारी या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र अर्जुना नदीला पूर असल्याने कालच्या गुरूवारचा आठवडा बाजार एसटी डेपो परिसरात भरला होता. त्यामुळे या ठिकाणी फारशी वर्दळ नसल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

 

दरम्यान राजापूर शहर हे ब्रिटीशकालीन बंदर म्हणून पसिध्द होते. आजही अनेक जुन्या इमारती राजापूर शहर बाजारपेठेत आहेत. मात्र वर्षानुवर्षे अशा इमारतींमध्ये वास्तव्य नसल्याने काही इमारती जीर्ण होऊन कोसळण्याच्या स्थितीत आहेत. यापूर्वी शहर बाजारपेठेतील रस्त्यालगत असलेल्या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळण्याची घटना देखील घडलेली आहे. राजापूर बाजारपेठेत दाटीवाटीने दुकाने वसलेली आहे. त्यातच बाजारपेठेतील रस्त्यावर ग्राहकांसह शहरातील नागरीकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. अशावेळी या धोकादायक इमारतींमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

 

यापूर्वी धोकादायक इमारत कोसळण्याची घटना घडल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने अशा इमारत मालकांना इमारत कोसळून घेण्याबाबतची नोटीसा बजावल्या होत्या. तसेच धोकादायक इमारती स्वतहून उतरवून न घेतल्यास फौजदारी दाखल करण्याचा इशाराही नगरपरिषद प्रशासनाने दिला होता. मात्र अद्यापही काही धोकादायक इमारती तशाच असून नगरपरिषद प्रशासनाने त्यांच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. गुरूवारच्या घटनेनंतर तरी प्रशासनाने अशा धोकादायक इमारतींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.