जागतिक आदिवासी दिनानिमित्त जमणार आदिवासी बांधव
चिपळूण (वार्ताहर ): आदिम आदिवासी कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन चिपळूण येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी देवेंदर सिंह आणि मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारा यांची उपस्थिती लाभणार आहे
जागतिक आदिवासी दिन हा संपूर्ण देशामध्ये 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस देशातील आदिम आदिवासी कातकरी संघटनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. देशाच्या क्रांतिकारी लढ्यात आदिवासी बांधवानी आपले बलिदान दिले आहे. त्यांना या दिवशी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
आजही आपल्या देशातला व राज्यातील आदिवासी बांधव हा अनेक समस्यांनी पीडित आहे. त्यांना स्वतःची जमीन नसल्यामुळे घर बांधण्यासाठी अडचणी निर्माण होतात. रोजगारासाठी त्यांना स्थलांतर जीवन जगावे लागते. त्यामुळे या समाजातील मुलांचा शैक्षणिक विकास खुंटला आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन चिपळूण येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आदिम आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांच्याकडे आपल्या व्यथा मांडणार आहेत .
या कार्यक्रमाला चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण शशिकला अहिरराव, गटविकास अधिकारी चिपळूण उमा घारगे पाटील, उद्योजक प्रशांत यादव, सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर, लेखक जाफर गोटे, ओबीसी संघर्ष समन्वय समिती चिपळूण तालुका सरचिटणीस पत्रकार संतोष कुळे, कार्याध्यक्ष भारत जोडो संघटनेचे सचिन मोहिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी जिल्हास्तरी मेळाव्याला जिल्हाभरातून आदिवासी बांधव चिपळूण येथे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी कातकरी संघटना आणि संघटनेचे जिल्हाअध्यक्ष विलास रामचंद्र निकम, कार्याध्यक्ष प्रमोद जाधव, जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव, महिला जिल्हाध्यक्षा निता निकम, चिपळूण तालुका अध्यक्ष संजय जगताप, खेड तालुका अध्यक्ष मंगेश निकम, दापोली तालुका अध्यक्ष विठोबा जगताप आणि गुहागर अध्यक्ष संतोष निकम आणि सर्व तालुका प्रमुख पदाधिकारी मेहनत घेत आहेत.











