भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सुंदरवाडीचे माजी कार्यसम्राट नगराध्यक्ष संजू परब वाढदिवस विशेष !
जिद्द, चिकाटी, मेहनत व महत्वाकांक्षा या गुणांच्या जोरावर समाजकारण व राजकारण यांची योग्य सांगड घालत ऐतिहासिक सुंदरवाडी नगरीचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या संजू परब यांनी आज सावंतवाडीकर नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कोणत्याही प्रसंगात सुख दुःखात धावून येणारा ‘आपला हक्काचा माणूस’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सावंतवाडीचे कार्यसम्राट नगराध्यक्ष म्हणून मी यशस्वी कारकीर्द भूषविल्यानंतर आता त्यांनी सावंतवाडी मतदारसंघाचे नेतृत्व करावे अशी येथील आम जनतेची इच्छा आहे. ‘जनतेच्या मनातील आमदार ‘ म्हणून त्यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडली गेली आहे. सत्तेच्या कोणत्याही पदावर नसलेले नेते जेव्हा जनतेला हवेहवेसे वाटतात तेच नेते सामाजिक नेतृत्व करू शकतात. असेच कार्यकुशल नेतृत्व असलेल्या संजू परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने …

सच्चिदानंद उर्फ संजू परब. शाखाप्रमुख, काँग्रेसचा व त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व भाजपचा जिल्हास्तरीय पदाधिकारी ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष एक थक्क करणारा राजकीय प्रवास. संजू परब या नावाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भल्याभल्यांना दखल घ्यायला लावली. आपल्या सडेतोड बोलण्याने विरोधकांना अंगावर घेतले तर नगराध्यक्ष पदाच्या कार्यकालात तेवढ्याच ताकदीने प्रशासन चालवत आपण एक कार्यकुशल प्रशासक असल्याचेही आपल्या कतृत्वाने सिद्ध केले. नेतृत्व दातृत्व व कतृत्व या तिन्ही गुणांना मेहनतीची जोड देत समाजकारण व राजकारणाची सांगड घालत आपल्या कार्यकतृत्वाने केवळ सावंतवाडीतच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात स्वतःची वेगळी ओळख संजू परब यांनी निर्माण केली.

दानशुरपणा हा संजूचा महत्वाचा गुण. या गुणामुळे आज संजू हा ‘जनतेच्या मनातील आमदार ‘ बनला आहे हे विशेष. होय, संजू हा या मतदारसंघातील आमदारकीचा प्रबळ दावेदार आहे. यामुळेच त्याने सिंधुदुर्गातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. दूरदृष्टी असलेले चाणाक्ष नेतृत्व म्हणून संजू परब यांच्याकडे पाहिले जाते. उत्तम राजकीय व्यवस्थापनाचे कौशल्य, नावीन्याचा ध्यास आणि दूरदृष्टीचे वरदान असल्याने काहीतरी करीत राहण्याची नेहमी धडपड ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये आहेत. समाजकार्यासाठी सतत नाविन्याच्या शोधात दूरदृष्टीने आणि चाणाक्षपणे विकासकामांची बांधणी करत सावंतवाडी मतदारसंघाचं रूप पालटण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.

नगराध्यक्ष पदावर असताना आलेल्या कोरोना महामारीच्या काळात घरात न बसता जीवावर उदार होऊन सावंतवाडीकरांसाठी रस्त्यावर उतरून त्यांना सहकार्य करत आपण केवळ राजकारण करीत नाही तर आपला वसा हा समाजकारणाचा आहे हे देखील सर्वांना आपल्या कृतीतून दाखवून दिलं. त्यामुळेच राजकारणात विरोधक असले तरीही सर्वपक्षीय नेत्यांना संजू बद्दल नेहमीच आदर राहिला आहे.

मडूरा सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांचे शिक्षण व पदवी शिक्षण सावंतवाडीतच झाले. मुळापासून नेतृत्वाचे गुण असणारा हा कार्यकर्ता माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे यांच्या संपर्कात आला आणि त्या परिसस्पर्शाने अक्षरशः सोने होऊन गेला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. माजी खासदार निलेश राणे यांचा तर संजू म्हणजे आपला घरातील माणूस. ते भावाप्रमाणे त्याच्यावर प्रेम करतात. संजूचा गणपती असो किंवा अन्य कोणताही सण, वाढदिवस असो की घरातील कोणताही कार्यक्रम ते प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. संजू देखील नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. आपले राजकारणातील गुरु म्हणून संजू नेहमीच त्यांचा उल्लेख करतो मात्र त्यांचं नातं हे गुरु शिष्य एवढचं मर्यादित न राहता मैत्रीच्या पलीकडचं आहे.

मैत्री जपण्याची एक विलक्षण हातोटी संजू परब यांच्याकडे आहे. मैत्रीला निःस्वार्थपणे जागणारा एक उत्तम मित्र. असा त्यांचा त्यांच्या मित्रपरिवारात लौकिक आहे. स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू, एखाद्या पक्षाच्या नेत्यापासून ते समपातळीवरील नेत्यांपर्यंत आणि छोट्या-मोठ्या कार्यकत्यांसमोर ही ते अत्यंत स्पष्टपणे व परखडपणे आपली भूमिका मांडतात. त्यांनी मांडलेली मते, घेतलेली भूमिका अथवा निर्णय अचूक असतात. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी त्या निवडणुकीचे सर्वोत्तम व्यवस्थापन हा आजच्या राजकारणाचा विजयी मंत्र आहे. संजू परब यांना हाच मंत्र गवसला आहे त्यातूनच त्यांच्यावर पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी ते लिलया पार पाडतात व दैदिप्यमान यशही मिळवत विरोधकांना त्यांच्याच सारीपाटावर अक्षरशः चितपट करतात.

भाजपा पक्षात प्रवेशानंतर देखील लागलीच सावंतवाडी नगराध्यक्षपदाची पोटनिवडणुक लागली. यात संजू परब यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून भाजपाने उमेदवारी दिली. या निवडणुकीत तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेशजी राणे, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या सहकारी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते पांच्या सहकार्याने संजूने या निवडणुकीत विरोधी उमेदवारावर मात करत नगराध्यक्ष पद मिळवले. महत्वाची गोष्ट म्हणजे हे नगराध्यक्ष पद सावंतवाडी तील जनतेने निवडून दिल्यामुळे मिळाले. अगदी तीन चार महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील साडेतीन हजाराचा फरक काढून पावणेचारशे मतांनी ते निवडून आले हे विशेष. त्यानंतर संजूला भाजपा जिल्हा प्रवक्ते हे पद मिळाले. या पदाला न्याय देत संजूने विरोधकांना अक्षरशः अंगावर घेतले. प्रत्येक वेळी बिनतोड व स्पष्टपणे बोलून त्याने अक्षरशः विरोधकांना घाम फोडला.

आतापर्यंतच्या या प्रवासात त्याची सुविद्य पत्नी मिनल, दोन्ही मुली वैष्णवी व सई, त्यांची आई व दिवंगत वडिल यांची समर्थपणे साथ लाभली. दोनवर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीत संजू परब यांनी आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता फिल्डवर उतरून अनेकांना मदत केली. कुंटुंबियांनीही त्याला यात मागे खेचले नाही उलट आतापर्यंत आलेल्या प्रत्येक सुखदुःखात त्याच्या कुटुंबीयाने त्याला समर्थ साथ दिली. त्यामुळेच सत्तेच्या राजकीय सारीपाटात एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे वावरणाऱ्या संजू परब यांनी कोरोनाच्या संकट काळात मानवतेचे पवित्र कार्य जपत त्यांनी “आरोग्यदूत’ बनून समाज सेवेचा वसा जपला.

नगराध्यक्षपदाच्या अवध्या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनाचे संकट असूनही आपल्या कार्याची छाप पाडली. सावंतवाडी शहरातील बॅरिस्टर नाथ पै नाट्यगृह व सभागृहाचे नुतनीकरण, स्वीमीग पूल, काझी शहाबुद्दीन हॉल यासारखे अनेक बंद प्रकल्प सुरू केले. मोती तलावातील सेल्फी पॉइंट तसेच शिव उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन केले. तर अनेक नव्या प्रकल्पांची मुहुर्तमेढ रोवली. यात पाळणेकोंड धरणाच्या गोडबोले गेटची उंची पाणी साठा वाढण्यास मदत झाली. गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या गाडगेबाचा भाजी मंडईचा प्रश्न मार्गी लावला, अग्निशमन केंद्र इमारत असो की कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प या प्रकल्पांना गती दिली. तसेच सावंतवाडी शहरासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ५६ कोटी १७ लाखांची नळयोजना मंजूर केली. त्यामुळे आता सावंतवाडीकर नागरिकांना भविष्यात २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. अशी एक ना अनेक कामे व प्रकल्प मार्गी लावून संजू परब यांनी सावंतवाडीकर नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.

आता पुन्हा एकदा निवडणूका होऊ घातल्या आहेत. कार्यसम्राट नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द भूषविलेल्या संजू परब यांनी सावंतवाडी मतदासंघाचे नेतृत्व करावे अशी येथील कार्यकर्ते तसेच आम जनतेचीही इच्छा आहे. जनतेच्या मनात असलेला आदर व प्रेम व विश्वास संजू परब नक्कीच सार्थ ठरवतील व त्यांना जनतेच्या मनातील यश नक्कीच प्राप्त होत सावंतवाडीकरांच्या सेवेची संधी नक्कीच प्राप्त होईल या त्यांच्या वाढदिनी प्रहार परिवाराच्या शुभेच्छा!
मो. ९४२२६३१८०८











