प्रमित जाधव याची प्रेरणादायी वाटचाल
राजापूर (वार्ताहर): वाटयाला आलेले कोणतेच काम हे छोटे मोठे नसते. मात्र त्या कामात झोकून देताना त्यातील सर्वोच्च शिखर गाठण्याची जिद्द माणसाला एक दिवस ध्येयप्राप्तीचा आनंद मिळवून देतेच. याचे जिवंत उदाहरण ठरलाय तो राजापूरातील एक सामान्य सफाई कर्मचारी. प्रमित जाधव असे या सफाई कर्मचाऱ्याचे नाव असून सफाई कर्मचारी म्हणून काम करत असताना त्याने स्वच्छता निरीक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते सत्यात उतरण्यासाठी स्पर्धा परिक्षेचा सोपान चढत त्यात यश मिळविले. आणि गुरूवारी प्रमित रत्नागिरी नगर परिषदेच्या स्वच्छता निरीक्षकपदी (सॅनिटरी इन्स्पेक्टर) रूजू झाला देखील झाला आहे.
सफाई कामगार म्हणून गेली पाच वर्षे राजापूर नगर परिषदेत हंगामी पदावर कार्यरत असलेल्या प्रमित प्रकाश जाधव या कर्मचाऱ्याची शैक्षणिक पात्रतेमुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या स्वच्छता निरीक्षकपदी (सॅनिटरी इन्स्पेक्टर) नियुक्ती झाली आहे. त्याने गुरूवारी हा पदभार स्वीकारला.
रत्नागिरी जिल्ह्यातील हे दुसरे उदाहरण आहे. यापूर्वी सन २०२१ मध्ये चिपळूणमध्ये वडीलांच्या जागेवर अनुकंपाखाली रूजू झालेल्या महेश मधुकर जाधव या सफाई कामगाराची आरोग्य निरीक्षकपदाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चिपळूणच्या आरोग्य निरीक्षकपदी नियुक्ती झालेली आहे. या दोघांचीही कहाणी प्रेरणादायी आहे.
राजापूरच्या प्रमित जाधव यांचे वडील प्रकाश जाधव हे येथील नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून काम करीत होते. सुमारे ३२ वर्षे त्यांनी सेवा बजावली. आजही कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी निवृत्तीनंतरही ते स्वच्छतेचे खासगी काम करीत आहेत. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर लाड-पागे वारसा हक्क समितीच्या प्रक्रियेखाली सुमारे पाच वर्षे प्रमित जाधव यांने सफाई कर्मचारी म्हणून रूजू होत झाडू हातात घेतली. प्रमित यांने सफाईचे काम करीत असताना अनेक वर्षे स्वच्छता निरीक्षक या पदाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला होता. प्राप्त परिस्थितीतही आकाशाला गवसणी घालण्याचे ध्येय उराशी बाळगून दिवस संपताच हाती घेतलेली झाडू बाजूला ठेवताच त्याचे अध्ययन सुरूच होते. प्रमित याच्या लेखी सफाई काम हे कमी नव्हते मात्र याच कामातील उच्च पदापर्यंत शैक्षणिक पात्रता प्राप्त करून पोहोचण्याचे त्याचे ध्येय होते. बी. कॉम. चे शिक्षण पूर्ण होताच त्याने राज्यसेवा स्वच्छता निरीक्षक पदाची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. त्यानंतर त्याने २२ ऑगस्टपासून रत्नागिरी नगर परिषदेत स्वच्छता निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
राजापूरचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले व अधिकारी-सहकारी कर्मचारी यांचे सततचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे आपण आज ही मजल मारू शकल्याची कृतज्ञतेची भावना प्रमित जाधव यांनी व्यक्त केली आहे. रत्नागिरीसारख्या अ वर्गीय नगर परिषदेत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने राज्य शासनालाही धन्यवाद दिले आहेत. नवे आव्हान स्वीकारण्यासाठी रत्नागिरीकरांच्या सहकार्याची अपेक्षा देखील त्याने व्यक्त केली आहे. तर प्रमित याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.












