शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट हीच मंडळी जबाबदार ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण 

 

 

गुन्हे दाखल ; शिवप्रेमी या दुर्घटनेसाठी कारणीभूत असणाऱ्यांना माफी देणार नाही

मालवण | प्रतिनिधी : राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला ही घटना अतिशय गंभीर, दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हा पुतळा उभारण्याची संपूर्ण प्रक्रिया ही नौदलाच्या अखत्यारीत झाली आहे. हा पुतळा उभारण्याचे काम हे कंत्राटदार जयदीप आपटे यांच्या आर्टिस्टरी या कंपनीला देण्यात आले होते. डायनॅमिक स्ट्रक्चरचे डॉ. चेतन एस पाटील हे या कामाचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट होते. या कामाची वर्क ऑर्डर देखील नौदलाकडूनच देण्यात आली होती. केवळ ८ महिन्यांमध्ये अशी दुर्घटना घडत असेल, तर त्याला शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट हीच मंडळी जबाबदार आहेत. असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 

समुद्रकिनाऱ्यावरील खाऱ्या वाऱ्यामुळे पुतळा जॉइंट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या नट बोल्टला गंज पकडला होता. यातूनच ही दुर्घटना घडली असावी, असं प्राथमिक अंदाजातून समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच यासंदर्भातील एक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला दिले होते.

 

तरीही घडलेल्या दुर्घटनेमुळे आम्हा सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील दोषींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. कुठलाही शिवप्रेमी या दुर्घटनेसाठी कारणीभूत असणाऱ्यांना माफी देणार नाही!

 

तसेच शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेत लवकरात लवकर याठिकाणी पुतळा उभारण्यात येईल, अशी ग्वाही देतो. असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अन्य उपस्थित होते.