लेखकाची संवेदनशीलता समाजाचे प्रश्न मांडते – पानिपतकार’ विश्वास पाटील

 

आबलोली : मराठी भाषेच्या शब्दात मोठी ताकद असून एखादा शब्द इकडचा तिकडे गेला कि त्याचा अर्थ बदलतो. अशी जगप्रसिध्द असणारी आपली माय मराठी भाषेत मोठे सामर्थ्य आहे. नव्या पिढीने वाचनाप्रमाणेच लिखाणाची सवय जपलीच पाहिजे. साहित्यात लिखाण करण्यासाठी खेड्यापाड्यातील पिढीने खऱ्या अर्थाने व्यक्त व्हायला पाहिजे, लिखाणातून तुम्ही दाखवलेली शब्दाची ताकद ही तुमची नवी ओळख करून देईल, असे मत पानिपतकार, सुप्रसिध्द साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

 

 

चिपळूण शहरातील लोकामान्य टिळक वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात राज्यस्तरीय जागर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पानिपत कादंबरी लिहिल्यापूर्वी आपण लिखाण करत होतो.. मात्र त्यास तितकासा प्रतिसाद लाभत नव्हता. याच जाणीवेतून स्वतःला झोकून देत पानिपत कादंबरी लिहिली. कादंबरी प्रकाशित होताच याच कादंबरीने आपली ओळख निर्माण केली. इतकेच नव्हे तर या कादंबरीने आपल्याला जीवनात मोठे यश मिळवून दिले. हेच प्रत्येक साहित्यकाराने वेचले पाहिजे, स्वतःला झोकून देऊन लिखाण करण्यासाठी अभ्यासही करावा लागतो आणि त्यातून साहित्यकार जन्माला येत असतो. लिखाणाचा एकतर तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे नाहीतर ज्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहचलं पाहिजे. लेखनासाठी चांगले विषय शोधा, निश्चितपणे ते वाचकालाही आवडेल. मराठी भाषेच्या शब्दात मोठी ताकद, सामर्थ्य आहे. आज वाचकाला काय हवे, त्यानुसार लिखाण केले पाहिजे. शिवाय ग्रामीण भागातून लेखक तयार व्हायला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विनोदी साहित्य, मराठी भाषा, यासह जीवनातील काही विनोदी किस्से पाटील यांनी उलघडताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

 

 

यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती कमी होवू लागली आहे. लेखक होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तितकाच
संस्कार मुलांवर केले पाहिजेत, कारण एखाद्या उच्चशिक्षिताला मराठी लिखाण म्हणावे तसे जमत नाही. त्यामुळे वाचनाप्रमाणेच लिखाणाचा समावेश हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सुप्रसिध्द लेखक, साहित्यिक भास्कर हांडे तसेच लेखक, गझलकार रमेश सरकाटे यांना ‘पसासदान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२३ने सन्मानित करण्यात आले. याबरोबरच लेखक देवा झिंझाड व लेखक शरद तांदळे यांना ‘डॉ. नागनाथ कोतापल्ले बहुचर्चित कादंबरी पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, प्रा. सुहास बारटक्के यांना लिहिलेला ‘वशाट’ व इतर कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील, पसायदान प्रतिष्ठानचे डॉ. बाळासाहेब लबडे, शाहीर शाहिद खेरटकर, प्रसिध्द कवी अजय कांडर, सतीश कदम, साहित्याचे अभ्यासक महंम्मद मुसा, डॉ. श्रीकांत पाटील, चिपळूण अर्बन बँकचे चेअरमन मोहन मिरगल, सतीश खेडेकर, राम रेडीज, संतोष मोहिते, दीपक कारकर आदींसह साहित्यिक, साहित्यप्रेमी उपस्थित होते.