शिवसृष्टीतील मावळ्यांच्या तोडफोड प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी घेतला निर्णय
शिवप्रेमींच्या मागणीनंतर तत्काळ झाली कारवाई
रत्नागिरी । प्रतिनिधी :सोमवारी सकाळी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतीच्या शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्याची तोडफोड झालेली दिसून आली होती. याप्रकरणी मावळ्यांचे हात पाय सुद्धा तोडून टाकण्यात आले होते. यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले होते. हा प्रकार एका मद्यपीने केल्याची माहिती शहर पोलिसांनी शिवप्रेमींना दिली होती आणि त्याला अटक करून कारवाई सुद्धा करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं.
मात्र या घटनेनंतर अनेक महत्त्वाचे प्रश्न शिवप्रेमी रत्नागिरीकरांनी उपस्थित केले होते. त्यामध्ये मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात घडलेल्या घटनेनंतर रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील महाराजांच्या पुतळ्याभोवती पोलीस बंदोबस्त का ठेवण्यात आला नव्हता ? सीसीटीव्ही का सुरू केले नव्हते ? तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पर्यवेक्षक किती काळाने तिथे गेला आणि नगरपरिषदेकडून या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेतली गेली या सगळ्याच गोष्टींचा जाब शिवप्रेमींनी नगर परिषदेत जाऊन मुख्याधिकारी तुषार बाबर यांना विचारला. यावेळेला शिवप्रेमींनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि पर्यवेक्षकांकडून मिळालेली माहिती याचा ताळमेळ बसत नसल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आणि त्यांनी आपल्या भावना मुख्याधिकाऱ्यांसमोर व्यक्त करताना नगरपरिषद प्रशासनाकडून अक्षम्य दिरंगाई झाली असल्याची भूमिका मांडली. रत्नागिरी शहरात महत्त्वाच्या ठिकाणी महत्त्वाच्या महापुरुषांचे देवतांचे पुतळे आहेत अशा वेळेला नगर परिषदेकडून त्यांच्या देखभालची कोणतीही काळजी घेतली जात नाही असेही या वेळेला म्हणण्यात आलं.
शिवप्रेमींच्या भावनांची आणि मागणीची तत्काळ दखल घेऊन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी या संदर्भात पर्यवेक्षक नितीन यादव यांचे तात्पुरते निलंबन केलं असून त्यांच्यावर चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल 48 तासात देण्यात येईल असं सांगितलं. तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक येथे 24 तास सुरक्षारक्षक नेमण्यात येईल, महाराजांच्या पुतळ्यासमोर 24 तासात सीसीटीव्ही बसवण्यात येईल असेही तुषार बाबर यांनी या शिवप्रेमींना सांगितलं. झालेल्या सर्व घटनेबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करत नगरपरिषद तात्काळ कार्यवाही करेल असेही त्यांनी सांगितले.












