देवरूख (प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नगरपंचायततर्फे गणेश विसर्जन सोहळयाकरीता विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
देवरुख नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत वसुंधरेचे जतन व पर्यावरण संवर्धन या निकडीच्या प्रश्नांवर उपयायोजना करण्याच्यादृष्टीने नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात कृत्रिम तलाव निर्मिती करण्यात येत आहे त्याचबरोबर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील निळकंठेश्वर मंदीर, शाळा क्र.१, मच्छीमार्केट व बागवाडी या गणेश विसर्जन घाटांवर मुर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या ठिकाणी गणेशभक्तांनी श्रीगणेशाच्या मुर्ती जमा करणेकरीता नगरपंचायत प्रशासनाकडून प्रसिध्दीमाध्यमांद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
या मुर्तींचे नगरपंचायत कार्यालयाजवळील कृत्रिम तलावामध्ये विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे.
तसेच निळकंठेश्वर मंदीर, शाळा क्र.१, पंतजोशी मंदीर, दत्तमंदीर, मशिदीजवळ नदीपलीकडे, मच्छीमार्केट व बागवाडी या सर्व विसर्जन घाटांवर श्रीगणेश विसर्जन सोहळयाच्या दिवशी नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांचे एक-एक पथक सुरक्षा साहित्यासह नियुक्त करण्यात आले आहे. विसर्जन घाटांवर कोणताही अपघात घडू नये यादृष्टीने ही उपायोजना करण्यात आली आहे. सर्व विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश व प्रकाशव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवादरम्यान बाजारपेठेत वाहतूक कोंडी होवू नये याकरीता पार्कींग व्यवस्था करण्यात आली आहे.
खालची आळी त्रिविक्रम मंदीर जवळ, माणिक चौक दत्तमंदीर पुलाजवळ, देवरुख पोलीस वसाहतजवळील मोकळे मैदान, देवरुख पोलीस स्टेशनजवळील मोकळे मैदान व पंचायत समिती कार्यालय आवार येथे पार्कींग सुविधा करण्यात आली आहे. तरी शहरातील सर्व गणेशभक्तांनी श्रीगणरायांच्या मुर्तीचे विसर्जन करण्याकरीता मुर्ती संकलन केंद्र, कृत्रिम तलाव, निर्माल्य कलश या सुविधांचा वापर करुन पर्यावरण व वसुंधरेच्या रक्षणासाठी सहकार्य करावे. नदीपात्रात विसर्जनाकरीता उतरताना आवश्यक ती काळजी घ्यावी, वाहतुक कोंडी टाळण्याकरीता पार्कींग सुविधा काटेकोरपणे अवलंबावी असे आवाहन चेतन विसपुते, मुख्याधिकारी देवरुख नगरपंचायत यांनी केले आहे.











