सभासदांना दहा टक्के लाभांश जाहिर
१०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
राजापूर (प्रतिनिधी): ‘सर्वसामान्यांची जिव्हाळयाची बँक’ ही बिरूदावली जपत राजापूर अर्बन बँकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात केलेल्या आर्थिक प्रगतीचा गौरवपुर्ण उलेख करत सभासदांनी रविवारी पार पडलेल्या बँकेच्या १०३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेवर अभिनंदनाचा वर्षाव केला. संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी सभासदांनी पारित केला.
तर यावर्षी बँकेच्या सभासदांना संचालक मंडळाने शिफारस केलेला दहा टक्के लाभांश मंजूर करताना बँकेने पुढील वर्षी मात्र १५ टक्के लाभांश सभासदांना द्यावा अशी मागणीही यावेळी उपस्थित सभासदांनी केली. तर बँकेने आपले स्वताचे बँकिंग स्वॉप्टवेअर डेव्हलप करण्याबाबत विचार करावा अशी मागणीही यावेळी सभासदांनी केली.
यावेळी बँकेच्या अध्यक्षा सौ. अनामिका जाधव यांनी सभासदांचे विश्वस्त म्हणून काम करताना कायमच सभासदांचे आणि बँकेचे हित डोळयासमोर ठेऊनच आंम्ही काम करत आहोत, व यापुढेही करत राहू, त्यामुळे आपण उपस्थित केलेले प्रश्न आणि सुचनांची योग्य पध्दतीने दखल घेऊन कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही यावेळी सभासदांना दिली.
राजापूर अर्बन बँकेची १०३ वी वार्षीक सर्वसाधारण सभा रविवारी बँकेच्या अध्यक्षा सौ. अनामिका जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवाळे कॉप्लेक्स येथील मातोश्री सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष विवेक गादीकर बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, सीईओ शेखरकुमार अहिरे आदींसह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. जाधव यांनी बँकेच्या एकूणच प्रगतीचा आढावा घेतला. बँकेचे सभासद, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार तसेचे बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे सुयोग्य नियोजन आणि सहकारी संचालकांची भक्कम साथ यामुळे बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी बँकेच्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडला. भारतीय रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याच्या सूचना व मार्गदर्शक तत्वांचे पालन करत उत्पन्न आणि खर्च यांचा सुयोग्य ताळमेळ साधत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ठेवी, कर्जवितरण, वसुली, नफा, एकुण व्यवसाय अशा सर्वच आघाडीवर साधलेल्या चौफेर प्रगतीबद्दल व विविध पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल समाधान व्यक्त करत अध्यक्ष, व नवनिर्वाचित संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांचे अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला.
याप्रसंगी बँकेच्या वार्षिक अहवालावर चर्चा करण्यात आली. यावेळी रवींद्र नागरेकर, उल्हास खडपे, मंदार सप्रे, रविकांत भामत, शंकर चोरगे, हुसेन नेवरेकर, जी. आर. कुलकर्णी, सुनिल जठार आदी सभासदांनी अहवालावरील मुद्दयांवर चर्चा केली. यावेळी उल्हास खडपे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी बँकेने सहकार्य करावे अशी मागणी यावेळी केली. याबाबचे पत्र आपण बँकेला दिल्याचे त्यांनी सांगितले. तर याबाबत माजी अध्यक्ष हनिफ काझी यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर काझी यांनी देखील नक्कीच बँक यावर सकारात्मक विचार करत असल्याचे सांगितले. तर याबाबत आंम्ही नक्कीच आवश्यक ते सहकार्य करू असे अध्यक्षा सौ. जाधव यांनी यावेळी सांगितले.
बँकेने आता स्वताचे स्वॉप्टवेअर निर्माण करावे जेणेकरून शासकिय योजनांचा अधिकाधिक लाभ सभासदांना देता येणे शक्य होईल असे नमुद केले. यावेळी याबाबत नक्कीच विचार केला जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे यांनी सांगितले. तर रविंद्र नागरेकर यांनी बँकेच्या कामकाजाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तसेच बँकेत काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे मानधन समान पध्दतीने देण्यात सर्वांना सारखे दयावे त्यात तफावत असून नये अशी मागणी केली. मुळातच तुटपुंच्या मानधनावर हे बेरोजगार काम करतात त्यामुळे त्यांना योग्य न्याय द्यावा अशी भूमिका मांडली. यावर योग्य अमंलबजावणी केली जाईल असे अध्यक्षा सौ. जाधव यांनी सांगितले. ज्येष्ठ सभासद शंकर चोरगे यांनी बँकेने ज्येष्ठ नागरिकांचा सर्वसाधारण सभेत सन्मान करावा अशी मागणी केली. यावरही बँकेच्या वतीने दखल घेऊन कार्यवाही करण्याची ग्वाही देण्यात आली.
या बैककीत मागिल सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करतानाच सन २०२३-२४ चा अहवाल, ताळेबंद व नफा तोटापत्रक वाचून मंजूर करण्यात आले. २०२३-२४ च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चाला मंजूरी देण्यात आली. लेखा परिक्षण व दोषदुरूस्ती अहवाल वाचून नोंद घेण्यात आली. सन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली. या सभेला मोठया संख्येने सभासद उपस्थित होते.
या सभेला बँकेचे सर्व संचालक तसेच बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक लक्ष्मण म्हात्रे, रमेश काळे, लेखापाल कमल चव्हाण, संगणक विभागाचे प्रमुख प्रसन्न खांबे, सर्व शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष विवेक गादीकर यांनी मानले.










