उद्योगमंत्र्यांच्या एमआयडीसीने पुन्हा एकदा गृहीत धरल्याने मिऱ्या ग्रामस्थांमधे तीव्र नाराजी

उद्योगमंत्र्यांच्या बैठकीचे अवघ्या 8 तासांपूर्वी दिले ग्रामपंचायतीला पत्र
एमआयडीसी अद्यापही ग्रामस्थांच्या भावनांबाबत गंभीर नाही
संतप्त ग्रामस्थांचा बैठकीवर बहिष्कार
सरपंचांनी पत्राद्वारे कळवली असमर्थता
रत्नागिरी | प्रतिनिधी
प्रस्तावित एमआयडीसी वर उद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी एमआयडीसी विभागाने फक्त ८ तास आधी मिऱ्या ग्रामपंचायतीला पत्राद्वारे याबाबत कळविल्याने एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या तोंडी आदेशाचा संदर्भ देत हे पेट काढले असून याबाबत आमच्या भावना तीव्र असताना उद्योग विभाग आणि प्रशासन केवळ आमची चेष्टा करत आहे अशा तीव्र प्रतिक्रिया मिऱ्या वडिलांमध्ये उमटत आहेत. दरम्यान कमी कालावधीत बोलावलेल्या या बैठकीला उपस्थित राहण्यास मिऱ्या सरपंचांनी असमर्थता दर्शवली आहे.

रत्नागिरी शहरा नजीकच्या मिऱ्या गावामध्ये प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीला तेथील स्थानिकांनी यापूर्वीच एकजुटीने ठामपणे विरोध केला आहे. या मिऱ्या गावातील जमिनीच्या भूसंपादनाची अधिसूचना 29 जुलै 2024 रोजी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर मिऱ्या ग्रामस्थांना आपल्या गावामध्ये एमआयडीसी प्रस्तावित असल्याचे समजले आणि एकच खळबळ उडाली होती. पर्यटन दृष्ट्या, पौराणिक दृष्ट्या, सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या गावातील ग्रामस्थांनी या एमआयडीसीला तीव्र विरोध केला आहे.

या पार्श्वभूमीवर या खात्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री आणि २० वर्ष रत्नगिरीचे आमदार असलेले उदय सामंत यांनी याविषयी आपण ग्रामस्थांशी चर्चा करू असं सातत्याने सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी विभागाकडून मिऱ्या सरपंचांना सहा ऑक्टोबर 2024 रोजी रात्री साडेआठ वाजता म्हणजेच आज बैठकीसाठी या अशा प्रकारचे नोटीस पाठवण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तोंडी दिलेल्या आदेशाचे संदर्भ या पत्रात दिला आहे. मात्र ही नोटीस सहा ऑक्टोबर रोजी म्हणजेच आजच सकाळी सरपंचाना मिळाली. म्हणजे या बैठकीला तब्बल 12 तासाचा सुद्धा कालावधी सरपंच आणि ग्रामस्थांना देण्यात आलेला नाही. यामुळे मिऱ्या ग्रामस्थ तीव्र संतापले असून सरपंचांनी या बैठकीला आम्ही अनुपस्थित राहणार असल्याचे पत्र एमआयडीसी विभागाला दिला आहे.

मिर्या ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय असतानाही एमआयडीसी मात्र अद्यापही मिऱ्या ग्रामस्थांना गृहीत धरत असून कमी कालावधीत बैठकीचे नोटीस बजावून ग्रामस्थांच्या भावनांचा आणि विरोधाची चेष्टा एमआयडीसी विभाग करते की काय अशा भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

याप्रकरणी आधीच एमआयडीसी विरोधातली मिऱ्या ग्रामस्थांची तीव्र असलेली भावना अधिक तीव्र होण्याचीच शक्यता वर्तवण्यात येत असून आधी कोणतीही पूर्वकल्पना न देता निघालेली अधिसूचना आणि कमी कालावधीत बजावलेली बैठकीची नोटीस यामुळे संतापलेल्या मिऱ्या वासियांशी उद्योग मंत्री उदय सामंत नेमके कोणत्या मुद्द्यावर चर्चा करणार याकडे हे आता पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे.