वेंगुर्ले : दाजी नाईक :शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालय आणि आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोड्यात ‘पुस्तकाविषयी बोलू काही’ हा कार्यक्रम संपन्न झाला. औचित्य होते वाचना प्रेरणा सप्ताहाचे. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि जयवंत दळवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. साहित्य कट्टाचे समन्वयक विनय सौदागर यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली व वाचन चळवळीचे महत्त्व त्यांनी विशद केले. त्यानंतर निमंत्रित वक्त्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकाविषयी विवेचन केले.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याअग्निपंख या पुस्तकाविषयी स्नेहा नारींगणेकर, सुधा मूर्ती यांच्या पितृऋण या पुस्तकाविषयी सरोज रेडकर, लस्ट फॉर लालबाग या रणजित देसाईंच्या पुस्तकाविषयी सचिन गावडे, शरद बाविस्कर यांच्या भुरा या पुस्तकाविषयी विनय सौदागर, वाह गुरू हे नाटक ज्यावर बेतले आहे त्या ट्युजडेज् वुईथ माॅरी या पुस्तकाविषयी अश्विनी पडवळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गिरीश कुबेर यांच्या टाटायन या पुस्तकाविषयी सचिन दळवी यांनी विस्तृत विवेचन केले. ग्रंथपाल अर्चना लोखंडे यांनी संभाजी राजे यांच्या बुधभूषण या पुस्तकाविषयी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांनीही या चर्चेत भाग घेतला होता. आठवीतील सानिया शेख हिने साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाविषयी ,तर दहावीतील मिहीर नाईक याने अग्निपंखच्या इंग्रजी आवृत्तीविषयी कथन केले.
शेवटी गजानन मांद्रेकर यांनी गोव्यात राबवित असलेल्या ‘वाचन साधना’ या अनोख्या उपक्रमाविषयी, तसेच पुस्तक भिशी या संकल्पनेविषयी सांगितले. मांद्रेकर सर हे मांद्रे-गोवा येथील साहित्य संगम या संस्थेचे कार्यवाह असून त्यांनी आतापर्यंत विविध उपक्रम राबविले आहेत.
या कार्यक्रमाला वाचकांचा भरपूर प्रतिसाद लाभला. शेवटी आभार प्रा. श्रीराम दीक्षित यांनी मानले. या कार्यक्रमाला ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन गावडे , एकनाथ शेटकर अविनाश जोशी, डाॅ. गणेश मर्ढेकर, वासंती माने, श्रीपल्ली लोखंडे, अँथोनी अल्मेडा, अनिल गावडे, सोमा गावडे, लक्ष्मीकांत कर्पे, धनुर्धारीचे सुनील कर्पे, बबन आडारकर आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे उपस्थित होते.












