जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बिपीन पाटणे यांचे प्रतिपादन
खेड(प्रतिनिधी) ‘हलाल प्रमाणपत्रा’ द्वारे शासन नियंत्रित व्यवस्था वगळून उत्पादकांचा पैसा अन्य बिगर शासकीय यंत्रणेकडे जात असेल तर देशाला यातून काय लाभ होणार, असा प्रश्न उपस्थित करत उत्पादक यांना कोणत्याही प्रमाणपत्रासाठी द्यावा लागणारा पैसा देशाच्या तिजोरीतच जमा व्हायला हवा. यासाठी हलाल अर्थव्यवस्थेविषयी व्यापारी आणि उत्पादक यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बिपीन पाटणे यांनी केले.
हिंदू राष्ट्र समन्वयक समितीच्या वतीने यंदा ‘हलाल’ मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रबोधन सुरू
करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या गाठीभेटी घेवून मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. याअंतर्गतचे निवेदन स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, हलाल अर्थव्यवस्थेविषयी व्यापारी आणि उत्पादक यांच्यात त्या त्या पातळीवर जनजागृती होणे नितांत गरजेचे आहे. केंद्र सरकारने याविषयी योग्य तो निर्णय देखील घ्यायला हवा, असेही स्पष्ट केले.
यावेळी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद बुटाला, तालुका व्यापारी समिती सदस्य सचिन
करवा, उमेश संसारे, विश्वास पाटणे, प्रमोद पार्टे, मिनार चिखले, माजी नगरसेवक संजय मोदी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनासह हस्तपत्रकही देण्यात आले. या गंभीर विषयावर लवकरच निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सचिन करवा, यांनी स्पष्ट केले. या प्रबोधन मोहिमेत धर्म जागरण तालुका संयोजक महेश सातपुते, हिंदू जनजागृती समितीचे शिवाजी सालेकर, श्रीकांत धुमाळ, डॉ. हेमंत चाळके आदी उपस्थित होते.











