राणेरुपी कर्तृत्वाच्या त्सुनामीत विरोधकांचा पालापाचोळा उडून जाणार !

विकासकामांची पत नसलेल्या वैभव नाईकांचा पराभव निश्चित

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी वैभव नाईकांच्या अपयशी कारभाराची केली चिरफाड

मालवण | प्रतिनिधी : मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आपल्या आक्रमक शैलीत उबाठावर जोरदार शाब्दिक प्रहार केला. टीकाटिप्पणी करून पोपटपंची करणाऱ्या उबाठा स्थानिक पदाधिकारी यांना फैलावर घेताना वैभव नाईक यांच्या अपयशी कारभाराचा पंचनामा नव्हे तर चिरफाड केली. विकासकामे करण्याची त्यांची पत नाही. असे सांगत मालवण शहरातील बसस्थानक, भाजी मंडई, अग्निशमन इमारत, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स या सारखे बहुचर्चीत प्रकल्पचे सांगडे उभे आहेत. शहर बकाल करण्याचे काम वैभव नाईक आणि त्यांच्या भाडोत्री नगरसेवकांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत मालवणच्या जनतेने विनायक राऊतांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता विधानसभेतही उबाठाच्या वैभव नाईक यांचा पराभव निश्चित आहे. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या पाठिशी सर्वसामान्य जनता ठाम उभी आहे. राणेरुपी कर्तृत्वाच्या सुनामीत विरोधकांचा पालापाचोळा उडून जाईल. काहीच शिल्लक राहणार नाही. असा हल्लाबोल माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केला.

मालवण तालुका भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आचरेकर बोलत होते. यावेळी भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, जगदीश गावकर, शहर प्रभारी संतोष गावकर, विलास मुणगेकर, ललीत चव्हाण, खरेदी विक्री संघाचे संचालक आबा हडकर, भालचंद्र राऊत, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.

मालवण नगरपालिकेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याने मामा वरेरकर नाट्यगृहाचा मेंटनन्स झाला नाही. गेल्या दहा वर्षात एकही रूपयाचा निधी नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी अगर अंतर्गत कामासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. वाळवी लागली आहे, छप्परातून पाणी थेट रंगमंचावर कोसळत आहे. बसण्याच्या खुर्चा अनेक नादुरुस्त झालेल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाट्यगृहासाठी तब्बल ३.५० कोटी रूपये मंजूर करत शहरवासियांसाठी सुसज्ज आणि सर्व सुविधांनीयुक्त नाट्यगृह उपलब्ध करून दिले होते. आज त्याची अवस्था येथील आमदारांच्या अपयशी कारभारामुळे झाली. शहरातील अर्धवट स्थितीत उभी असलेली भाजी मंडई, अग्निशमन इमारत, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स याचीही दुर्दक्षा अशाच पद्धतीने आमदारांमुळे रखडली. शहराच्या विकासाचे कोणतेही व्हिजन नसल्याने इमारती अर्धवट स्थितीत उभ्या केलेल्या आहेत.

देशातील पहिले रॉकगार्डन मालवणमध्ये नारायण राणे साहेब यांच्यामुळेच उभे राहिले होते. मागील काही वर्षात आमदारांनी आपल्या समर्थक नगरसेवकांच्या ताब्यात व्यवस्था देऊन रॉकगार्डन बकाल केले आहे. त्याठिकाणी कोणत्याही सुविधा सुरू नाहीत, यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. यामुळे लाखोंच्या संख्येने येणारे पर्यटन स्थानिक आमदाराच्या नावाने शिमगा करत आहेत. सर्वच विकासकामे ठप्प आहेत.

शहरवासियांनी आता बदलाचा निर्णय घेतलेला आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतील उबाठाच्या उमेदवाराला घरी बसवण्यात येणार आहे, असेही श्री. आचरेकर म्हणाले

नारायण राणे साहेब यांचे नेतृत्व कर्तृत्व मोठे आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी सर्व पदे भूषववले हे नेतृत्व जनतेच्या पाठिंब्यावर खासदार आहेत. स्वाभिमान पक्ष काढून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सत्ता केंद्रे काबीज केली होती. जिल्हा बँका, आमदार, खरेदी विक्री संघ, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांच्यावर स्वाभिमान पक्षाचा झेंडा फडकला होता. यामुळे एखादा पक्ष काढणे आणि त्याची निशाणी घराघरापर्यंत पोहचविणे यासाठी धमक लागते. राणे यांनी केलेल्या कामाची दखल घेत भाजप नेतृत्वानेच त्यांना सन्मानाने राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री बनविले होते. त्यावेळी त्यांनी स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे राणेंच्या कार्यासमोर उबाठा व विरोधक यांचे आरोप आणि बडबड फिकी आहे. पाळही नाही, मुळही नाही, पाल्लवीही नाही अशा अवस्था सध्या उबाठाच्या नेतृत्वाची झाली आहे. लोकसभेत नारायण राणेंच्या त्सुनामीत उबाठाचा पालापाचोळा उडून गेला होता. आता विधानसभेतही पराभव झाल्यानंतर उबाठाचे कार्यकर्ते नेतृत्वाच्या शोधात जाणार आहेत, असाही टोला श्री. आचरेकर यांनी मारला.

राणे कुटुंबियांवर बोलण्यापुर्वी विरोधकांनी आपली पत निर्माण करावी. राणेंनी केलेली विकासकामे आजही लोकांच्या स्मरणात आहेत, आणि प्रत्यक्षात उभी आहेत. माजी खासदार विनायक राऊत आणि वैभव नाईक यांनी अर्धवट केलेली विकासकामेही जनता उघड्या डोळ्यांनी पहात आहे. यामुळे राणेंवर टिका करण्यापुर्वी चिवला बिच बंधारा, रॉक गार्डन, राजकोट बंधारा, प्रशस्त रस्ते, धामापूर नळपाणी योजना, मामा वरेरकर नाट्यगृह या प्रकल्पांची माहिती घेऊन बोलावे. अन्यथा सर्वसामान्य जनता योग्य उत्तर देणार आहे, असाही टोला श्री. आचरेकर यांनी मारला आहे.

महायुतीच्या प्रचाराला शहरात आजपासून

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा झंजावात मतदारसंघात सुरु आहे. मालवण शहरात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून घरोघर प्रचाराला शनिवार पासून प्रारंभ केला जाणार आहे. असे भाजपा मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले.

वैभव नाईक अपक्ष उमेदवार: त्यांची मशाल विझणार : बाबा मोंडकर

कोकणात महायुती भक्कम आहे. महायुतीचे सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होतील. कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे यांचा विजय निश्चित असून अपक्ष उमेदवार वैभव नाईक यांचा पराभव करणार हे जनतेने ठाम निश्चित केले आहे. मशाल विझणार आहे. वैभव नाईक यांना पराभव दिसू लागल्याने वृद्ध आईला प्रचाराला उतरवावे लागत आहे. असे भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले.