राजापूर विधानसभा मतदार संघात अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला

रखडलेल्या विकासाभोवती फिरतेय निवडणूक

वाडीवस्तीवर घराघरात प्रचारावर उमेदवारांचा भर

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर- लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघात अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रमुख राजकिय पक्षांसह सर्वच उमेदवारांनी आता गाव आणि वाडीवस्तीवर घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यापुर्वी झालेल्या निवडणुकांप्रमाणेच यावेळची निवडणूक देखील चुरशीची होणार हे निश्चित आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने भाजपा, शिवसेना राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची महायुती विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, उ. बा. ठा. शिवसेना व मित्र पक्षांची महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. मात्र या निवडणूक प्रचारात रोजगार, शिक्षण व आरोग्य सुविधांबरोबरच राजापूर विधानसभा मतदार संघाचा रखलेला विकास हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा असून याच मुद्दयांभोवती राजापूरची निवडणूक फिरत आहे. त्यामुळे भविष्यात तरी राजापूरच्या विकासाची कवाडे उघडणार का हे ठरविणारी ही निवडणूक असून या मतदार संघातील जनता नेमका कुणाला कौल देते हे येत्या २३ रोजीच स्पष्ट होणार आहे.

 

 

राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४, आणि २०१९ अशा सलग विजयाची हॅट्रीक साधणारे उ. बा. ठा. शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीच्या वतीने पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी काँग्रेस देखील जोरदार आग्रही होती. तथापि महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार जागा वाटपामध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला मिळाला. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे. तर महायुतीकडून राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू, सिंधू रत्न समितीचे सदस्य किरण सामंत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. लाड यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडी मधील अंतर्गत मतभेद पुढे आले असून त्यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होत आहे.

 

 

 

या तीन प्रमुख उमेदवारांसह बसपाचे संदीप जाधव, शिव स्वराज्य संघटना कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव, त्यांच्यासह अपक्ष म्हणून अमृत तांबडे, यशवंत हर्याण, राजेंद्र रवींद्रनाथ साळवी हे देखील आपले नशीब आजमावत आहेत. मात्र या मतदारसंघातील खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार असली तरी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवशर अविनाश लाड कोणाची डोकुदुखी वाढवतात हे देखील महत्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार राजन साळवी हे गेली १५ वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मतदार संघात त्यांचा असलेला दांडगा संपर्क आणि, पक्षाशी असलेली एकनिष्ठता या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र गेल्या पंधरा वर्षात राजापूर मतदार संघ सर्वांगिण विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यातच आ. साळवी यांनी नाणार व बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत वारंवार बदललेली भूमिका देखील चर्चेत असून बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यात त्यांना यश आलेले नाही. त्यामुळे याबाबतही मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागत आहे.

 

 

महायुतीचे उमेदवार किरण सामंत हे प्रथमच निवडणूक लढवत आहेत. मात्र मागील अनेक वर्षे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा या क्षेत्रात कार्यरत आहेत. गेले काही महिने त्यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित करताना या मतदारसंघात त्यांनी सातत्याने आपले दौरे कायम ठेवले आहेत. यात त्यांनी संघटन वाढीवर जोरदार भर दिला आहे. किरण सामंत यांच्या पाठीशी त्यांचे बंधू आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ठामपणे उभे असून अलीकडच्या काळात ना. सामंत यांनी मतदार संघात विविध विकास कामाची भूमिपूजन आणि उद्घाटने करत राजापूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केलेले आहे.

 

 

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अविनाश लाड हे काँग्रेस आघाडीचे उमेदवार होते. त्यावेळी लाड यांनी त्यावेळी ५३ हजार ५५७ मते इतकी मते मिळविली होती. यावेळीही ते निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उतरले आहेत. त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे. स्थानिक उमेदवाराचा मुद्दा त्यांनी सातत्याने मांडला आहे. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचा कितपत प्रभाव पडतो हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या पाच उमेदवारांमध्ये संजय यादवराव यांनी २०१४ साली भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना ९ हजार ९५३ इतकी मते मिळाली होती. आता दहा वर्षांनी ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणचा विकास व्हावा असे ते सातत्याने मुद्दे मांडत असतात. महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या समन्वयावरही त्या त्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

 

 

अन्य अपक्ष उमेदवार देखील मतदार संघाच्या विकासावर आपली भूमिका मांडत असून उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचार यंत्रणेत गुंतले आहेत.आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झडत आहेत. मतदार संघाचा रखडलेला विकास, आलेले प्रकल्प त्यावरून सुरु असलेले राजकारण,भावनिक मुद्दे या भोवती ही निवडणूक राहील हे निश्चित आहे.
राजापूर विधानसभा मतदार संघाला आजही विकासाची प्रतिक्षा आहे. रस्ते, विज, पाणी, शिक्षण या सुविधांचा अभाव आहेच पण मतदार संघातील आरोग्य सुविधेची अवस्था भयावह अशी आहे. तर बेरोजगारीमुळे इथला तरूण वर्ग मोठया शहरांमध्ये स्थलांतरीत झाला आहे व होत आहे. त्यामुळे आज ग्रामीण भागातील ८० टक्के घरे बंद अवस्थेत आहेत. पटसंख्येअभावी दरवर्षी ग्रामीण भागातील चार पाच शाळा बंद पडत आहेत. भातपिकासह आंबा, काजू हे इथले पिक आहे, मात्र बदलत्या हवामानामुळे ते देखील शास्वत राहिलेले नाही.

 

 

निसर्ग संपन्न असा हा मतदार संघत आहे, विस्तीर्ण असा समुद्र किनारा या मतदार संघाला लाभलेला आहे, अनेक पर्यटन स्थळे आहेत, मात्र सेवा सुविधांच्या अभावामुळे आज हा मतदार संघ एक मागासलेला मतदार संघ अशी याची ओळख आहे. त्यामुळे भविष्यात या मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाची खरी गरज आहे. त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे आता राजापूर विधानसभा मतदार संघातील जनता कशा पध्दतीने कौल देते यावरच या मतदार संघाचे आणि मतदार संघातील जनतेचे भवितव्य अवलंबून आहे.
——————————————————-