राजापूर (प्रतिनिधी): काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी बंडखोरी करत राजापूर विधानसभा मतदार संघातुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. असे असतानाही राजापूर व लांजा तालुक्यातील दोन्ही काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अविनाश लाड यांचा उघड प्रचार करत असून काँग्रेस पक्ष लाडांसोबत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे राजापूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षातील ही बंडखोरी व आघाडीत झालेली बिघाडी महायुतीच्या पथ्यावर पडणार आहे.
तर लाड यांनी देखील निलंबनाच्या कारवाईनंतर जरी आपल्यावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी राजापूरात आपण काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी त्याचे अस्तीत्व जपण्यासाठीच लढत असल्याचे नमुद करत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देताना आपल्या बाजुने कायम ठेवले आहे.
लाड यांच्या या बंडखोरीमुळे राजापूर व लांजा तालुक्यातील बहुतांशी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते लाड यांच्या सोबत प्रचारात दिसत असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार आ. राजन साळवी यांची डोकेदुखी वाढली आहे. तर लाड यांच्या या बंडखोरीला काँग्रेस नेतृत्वाचा छुपा पाठींबा तर नाही ना अशी चर्चा सध्या राजापूरात सुरू आहे.
महाविकास आघाडीतील या बिघाडीचा फायदा मात्र महायुतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.










