एसटी चालक वाहकावरील हल्ला प्रकरणी पाचजण निर्दोष

रत्नागिरी | प्रतिनिधी : गैरकायदा जमाव करत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकांच्या कर्तव्यात हमला करुन अडथळा निर्माण करणार्‍या पाच संशयितांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. रमेश सिताराम काळंबे (26,रा.राजिवली संगमेश्वर),प्रविण वासुदेव पेढामकर (21,रा.कुटरे खैरेवाडी,चिपळूण) गणेश दत्ताराम कदम (21,रा.धामणदेवी,रायगड),स्वप्निल सुनिल कदम (20,रा.कुटरे खैरेवाडी,चिपळूण) आणि शैलेश सुभाष पंदेरे(22,रा.पूणे) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात चालक शरद सिताराम जाधव यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानूसार,10 सप्टेंबर 2013 रोजी दुपारी 3.30 वा.ते देवरुख आगारातून पाचांबे येडगेवाडी अशी मुक्कामी जाणार्‍या बसमधून प्रवाशी घेउन जात होते.सायंकाळी 5.45 वा.त्यांची बस गड नदीचा पूल ओलांडून तिसंगी फाट्याकडील नवीन पुलावर पोहचली असता त्याठिकाणी चिपळूण रातांबी ही अन्य एक बस उभी दिसली.शरद जाधव यांनी आपल्या बसमधून उतरुन पाहिले असता त्यांना पाचजण आपल्या दुचाकी रस्त्यावर आडव्या लावून दारु पित असताना दिसून आले.शरद जाधव पुन्हा बसमध्ये येउन बसले.
दरम्यान,चिपळूण रातांबी बसचे चालक स्वप्निल सुर्वेंनी त्या पाचजणांना दुचाकी बाजुला घेण्यास सांगिलते. याचा राग आल्याने त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली.सुर्वे यांना दगड लागून हाताला मार लागला.तसेच बसची काचही फूटली होती.सुर्वेंचा आरडा-ओरडा ऐकून प्रवाशांनी बाहेर येत पाच जणांपैकी तिघांना पकडले.तर स्वप्निल कदम आणि सुभाष पंदेरे हे दोन हल्लेखोर पळण्यात यशस्वी झाले होते.
संशयितांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 353,332,337,143,147,427,341 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या खटल्यात दोन्ही पक्षाच्या बाजून ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधिश एल.डी.बिले यांनी सबळ पुराव्या अभावी पाचही जणांची निर्दोष मुक्तता केली.संशयित आरोपींतर्फे अ‍ॅड.आदेश चवंडे,विवेक दुबे,प्राजक्ता दुबे,श्रध्दा कांबळे यांनी काम पाहिले.