प्रशासनाने पीक विमा योजनेची तारीख वाढवून १५ डिसेंबर केली…किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पोतकर यांचा पुढाकार!
रत्नागिरी : भाजपा किसान मोर्चा कायम शेतकर्यांच्यासाठी तत्पर राहत असतो. किसान मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश पोतकर हे किसान मोर्चाची धुरा अतिशय प्रभावीपणे सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत डॉ. अजित जोग, सुशांत मुळ्ये, प्रफुल्ल सुर्वे, सचिन आचरेकर हे जिल्हा सरचिटणीस म्हणुन उत्तमपणे सहकार्य आणि मार्गदर्शन करीत असताना जिल्ह्यातील विविध शेतकर्यांचे प्रश्न प्रशासकीय यंत्रणांपुढे किसान मोर्चातर्फे ज्ञानेश पोतकर यांच्या नेतृत्वासोबत मांडत आहेत. किसान मोर्चाची सर्व जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्षांसह सर्व टीम सुद्धा मोठे योगदान देत आहे. मोठे किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री. गणेशराव भेगडे तसेच सरचिटणीस श्री. संदीपदादा गिड्डे पाटील व राजनजी चिके हे सातत्याने ज्ञानेश पोतकर यांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत असतात. थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि संबंधीत मंत्र्यांशी संवाद साधत आले आहेत.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जुना सक्रीय युवा कार्यकर्ता असलेल्या ज्ञानेश पोतकर याचे कोकण चळवळीतील आणि शेतकऱ्यांसाठीचे प्रभावी कार्य पाहून त्याच्याकडे किसान मोर्चाचे जबाबदारी दिली, त्याला फ्री हँड देत शेतकऱ्यांसाठी अजून प्रभावी कार्य करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करत ज्ञानेश पोतकर यांनी किसान मोर्चाचे कार्य अधिक प्रभावी करत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. ज्ञानेश पोतकर स्वतः उच्चविद्याविभूषित असल्याने त्यात जेष्ठ विधीज्ञ श्री. भाऊ शेटये यांच्या तालमीत तयार झालेला अॅडव्होकेट असल्याने शासन दरबारी शेतकर्यांच्या तांत्रिक, प्रशासकीय अडचणी उत्तमपणे आणि प्रभावीपणे मांडत आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना अजूनही विमा परतावा मिळाला नाही, त्यात कोकणाच्या पीक विम्याचे निकष हे येथील परिस्थितीचा अभ्यास न करता केलेले आहेत. त्यासोबत विमा परतावा न देता विमा भरण्याची तारीख सुद्धा ३० नोव्हेंबर २०२४ केली होती. आचारसंहिता आणि त्यात अजून नवीन सरकार अस्तित्वात येत नाही तोवर प्रशासन शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसणार होते. हे कळताच ज्ञानेश पोतकर यानी सदर बाब किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री. गणेशराव भेगडे यांच्या कानावर घातलीच पण श्री. अनिकेत पटवर्धन यांचे मार्फत श्री. रविंद्र चव्हाण यांच्यापर्यंत हे शेतकर्यांच्या बाबतीत प्रशासन करीत असलेला हलगर्जीपणा सविस्तर सांगितला. त्यातच श्री. उदय सामंत यांच्याशी बातचीत करून त्यांना लक्ष देण्यासाठी विनंती केली. रत्नागिरीतील परिस्थितीवर स्वतः ज्ञानेश पोतकर लक्ष देऊन होते, त्यांना जेष्ठ शेतकरी व सरचिटणीस श्री. सचिन आचरेकर यांची मोलाची साथ लाभली. लांजा राजापूर तालुक्यातील शेतकर्यांच्यावतीने सरचिटणीस प्रफुल्ल सुर्वे यानी आमदार श्री. किरण सामंत याकडेही पाठपुरावा केला. संगमेश्वर चिपळूण तालुक्यातील शेतकर्यांच्यावतीने सरचिटणीस डॉ. अजित जोग व सुशांत मुळ्ये यांनी आमदार श्री. शेखर निकम यांचाही बोलून विविध मार्गाने प्रशासनावर दबाव आणला. आमदार नितेश राणे व आमदार निलेश राणे यांची सुद्धा मोलाची आणि महत्त्वाचे योगदान यामध्ये आहे, यांच्याशी ज्ञानेश पोतकर यांनी संवाद साधत सिंधुदुर्गातील पीक विम्याची परिस्थितीवर शासन आचारसंहितेचा गैरफायदा घेतय याचा पाढा वाचला.
श्री. गणेशराव भेगडे, श्री. रविंद्र चव्हाण, श्री उदय सामंत यांनी तात्काळ काळजीवाहू मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे यावर तात्काळ निर्णय घेण्याची विनंती केली. शेतकर्यांच्यासाठी हा निर्णय होणे महत्त्वाचे असल्याने आणि असे निर्णय कोणताही गैरफायदा घेऊन प्रशासनाने घेऊ नये अशा सुचना देऊन शेवटी पीक विमा भरण्याची तारीख १५ डिसेंबर केली गेली. एका राजकीय पक्षाची विंग लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मंत्री स्तरावर किंवा उच्चस्तरावर कार्य करताना सर्वांना एकत्रपणे हिताचे निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेते, रत्नागिरी किसान मोर्चासारखे उत्तम उदाहरण नाही.
किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश पोतकर यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले, “आम्ही ३० डिसेंबर तारीख मागितली होती पण मिळालेली तारीख सुद्धा मान्य आहे. त्यात अजूनही जुना परतावा शेतकऱ्यांना मिळालेला नाही तो तात्काळ मिळवा यासाठी आम्ही वरीष्ठ पातळीवर बोललो आहोत. कोकणातील विम्याचे चुकीचे निकष कोकणातील शेतकर्यांना मान्य नाहीत त्या दृष्टीने सुद्धा कार्यवाही होणार असून नवीन निकष शेतकऱ्यांना विचारून ठरवणार आहोत. त्यात कोकणातील शेतकर्यांना संपूर्ण, विनाशर्त कर्जमाफी मिळावी यासाठी मी जास्त आग्रही आहे. त्यानुसार येत्या नवीन सरकार निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हे यश पूर्ण महायुतीचे असून यामध्येकोणतेहीराजकारण नाही. आम्हाला शेतकरी महत्त्वाचे” असे ज्ञानेश पोतकर यांनी सांगितले.
किसान मोर्चाने अनेकदा आपल्या कार्याची चुणूक दाखवली आहे. संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पाला मान्यता देताना त्यावर तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा अहवाल जेष्ठ सरचिटणीस डॉ. अजित जोग यांनी अॅड. ज्ञानेश पोतकर यांच्या साथीने श्री. रविंद्र चव्हाण व श्री. उदय सामंत यांना दिला होता. याकामी आमदार शेखर निकम यांचेही सहकार्य मिळाले होते. राजापूर तालुक्यातील भू महसूली मंडळाबाबत आचारसंहिता सुरू असताना गोंधळाची भूमिका घेतली होती याकामी प्रफुल्ल सुर्वे यांनी ज्ञानेश पोतकर यांच्या सहकार्याने आक्रमक भूमिका घेत तो निर्णय बदलायला लावला होता, तेव्हा श्री. रविंद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन, आमदार किरण सामंत यांचे मोठे सहकार्य मिळाले होते. पंचायत समितीच्या वतीने अजूनही शेतकर्यांना अनुदानित अवजारे मिळत नसल्याबद्दल आणि खतांच्या वाटपाबद्दल सुशांत मुळ्ये यांनी आवाज उठवला होता. असे विविध उपक्रम राबवताना किसान मोर्चा कायमच शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याने जिल्ह्यात शेतकर्यांमध्ये समाधानकारक असे वातावरण आहे.
याआधी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे जनसुनावणीमध्ये कोकणातील कृषी पंप यांवर शेतकर्यांच्यावतीने विनामोबदला कार्य केले होते आणि कृषी पंप यांची बिले माफ करून टेरीफ बदलण्यासाठी मोठे योगदान दिले होते. याचा फायदा नुसत्या कोकणातील शेतकऱ्यांनाच नाही तर पूर्ण राज्याला झाला आहे. असे हे उच्चविद्याविभूषित प्रगल्भ व्यक्तिमत्त्व किसान मोर्चाचे नेतृत्व करीत आहे.
भाजपा किसान मोर्चाचे अजून महत्त्वाचे उद्दिष्ट हे कोकणातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आहेच पण त्यासोबत विमा निकष बदल, आंबा संशोधन केंद्र, कोकणातील फळांवर वाईन निर्मितीसाठी आणि कृषी पर्यटनासाठी प्रोत्साहन, सिंधुरत्न योजनेमध्ये शेतकऱ्यांना समावेश करणे असे विविध मागण्या नवीन सरकार स्थानापन्न झाल्यावर करणार असल्याचे अॅड. ज्ञानेश पोतकर यांनी सांगितले. तसेच विम्या संदर्भात तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, मंत्री रविंद्र चव्हाण व मंत्री उदय सामंत, अनिकेत पटवर्धन, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, आमदार नितेश राणे, आमदार निलेश राणे यासह मुख्य पुढाकार घेऊन तात्काळ वरीष्ठ पाळतीवर संपर्क करणारे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशराव भेगडे, प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील व राजन चिके या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. आपण संघटना म्हणुन आणि महायुती म्हणुन कायमच कोकणातील शेतकर्यांच्या सोबतीला उभे राहाल अशी भावना व्यक्त केली. तसेच माझ्या सोबतीने अनेक शेतकर्यांच्या संघटना, तसेच वैयक्तिकदृष्टीने अनेक जेष्ठ व अनुभवी शेतकर्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचेही किसान मोर्चाकडून विशेष आभार मानण्यात आले आहेत.











