शृंगारतळीत बेकरी दुकानात बिनधास्त घरगुती सिलेंडरचा वापर

संबंधित विभागाची डोळेझाक

शृंगारतळी (वार्ताहर ) गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेमध्ये बेकरी दुकानापुढे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी घरगुती सिलेंडरचा बिनधास्त वापर केला जात असून या गोष्टीकडे संबंधित यंत्रणेचे नक्की दुर्लक्ष होत आहे की जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे असा प्रश्न सर्व सामान्यांतून केला जात आहे. परंतु, धाडसी कारवाया होत नसल्याने व्यवसायिक बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे.

 

शृंगारतळी बाजारपेठेमध्ये बेकरी, चायनिज सेंटर, हॉटेल्स मोठया प्रमाणात आहेत. येथील काही दुकानदार व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जात आहे. सर्वसामान्य ग्राहकांना अनेक दिवस नोंदणी करुनही सिलेंडर मिळत नाही. घरगुती सिलेंडर व व्यावसायिक सिलेंडर यांच्या किमतीत दुपटीचा फरक आहे. पैसे वाचवण्यासाठी व्यावसायिक छुप्या पद्धतीने घरगुती सिलेंडरचा वापर करत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. काही दुकानात फक्त एक व्यावसायिक सिलेंडर दुकानात ठेवून आणि घरगुती सिलेंडरवर आपले काम करत असल्याचे दिसून येते. याकडे संबंधित यंत्रणेने या दुकान चालकाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. उघडपणे या गोष्टी प्रशासनाला आव्हान देत असून या प्रकाराकडे संबंधित विभागाची डोळेझाक होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.