मधमाशांचा हल्ल्यात दुधव्यावसायिक गंभीर जखमी

मिठमुंबरी येथील घटना

देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू

देवगड : प्रतिनिधी

दुधविक्रीसाठी मिठमुंबरी येथून देवगडला जात असताना मिठमुंबरी रस्त्यावर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दुधव्यावसायिक प्रकाश भिवा गावकर (६०), रा. मिठमुंबरी खालचीवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना २ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली.

प्रकाश भिवा गावकर हे दुधव्यावसायिक असून ते नेहमी देवगडमध्ये ग्राहकांना दुध पोहोचवण्यासाठी जातात. सोमवारी सकाळी ९ वाजता पायी ते मिठमुंबरी येथून दुध घेऊन देवगडकडे जात असताना रस्त्यातच मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे ते घाबरले आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोरीजवळ असलेल्या खाजणाच्या पाण्यात उडी मारली. त्यावेळी मधमाशांनी त्यांचा पिच्छा सोडला, परंतु हल्ला केल्यामुळे ते बेशुद्ध पडले.

ही घटना मिठमुंबरी येथील ग्रामस्थांना कळताच, त्यांनी तात्काळ धाव घेतली आणि प्रकाश गावकर यांना देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.