आवाशी – लोटे सीमेवरील पूल बनलाय अपघाताचे केंद्र

 
खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील लोटे आवाशी सीमेवरील पूल पूर्णपणे उखडला असून, सातत्याने येथे छोटे- मोठे अपघात होत आहेत. पावसाळा थांबल्यापासून व तत्पूर्वीही त्याची केलेली डागडुजी अनेक अपघातांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे तेथे अपघात होण्याचे भय संपत नसल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून या कामाच्या दर्जाबाबत राजकीय पक्ष, स्थानिक पदाधिकारी, सर्वसामान्य जनता, नागरिक व प्रवाशांनी असंतोष व्यक्त केला आहे. मात्र या कामावर बांधकाम विभागाचा अंकुश नसल्याने ठेकेदाराचे फावले आहे. ज्या हेतूने महामार्ग चौपदरी केला जात आहे, ती बाबच बाजूला पडत आहे. अपघात थांबण्याऐवजी त्यात वाढ होत आहे.
कशेडी घाटाच्या पायथ्यापासून सुरू झालेले हे काम पूर्णपणे दर्जाहीन असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. परशुराम घाट हे त्यातीलच एक आहे
आवाशी येथील पूल पूर्णपणे उखडला असून अपघातांचा धोका वाढला आहे.  तेथे तर अपघाताची मालिका सुरूच आहे. मंगळवारीही या घाटात अपघात झाला असून, एका कंपनीचे कामगार त्यात जखमी झाले. लोटे परशुराम औद्योगिक वसाहत ही खेड व चिपळूण तालुक्याच्या मध्यावर आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील वाहनांसह खेड व चिपळूण तालुक्यातील अनेकांची इथे दिवसरात्र ये-जा सुरू असते.
लोटे आवाशी सीमेवरही रात्रीच्या वेळी अनेकदा अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी इथे दुपारच्या वेळी एसटी बसचाही अपघात झाला होता. त्यानंतर तेथे डागडुजीसाठी टाकण्यात आलेली ग्रीट व खडी हेच अपघातासाठी कारणीभूत ठरत आहे. कोणाचा जीव गमावण्याआधी बांधकाम विभागाने त्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.