खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरणातील मध्यभाग गवताने वेढल्याने वाहनचालकांची फसगत होत होती. प्रसंगी अपघात देखील घडत होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याला सवड मिळाली आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई- गोवा खवटीपासून परशुराम घाटापर्यंतचे चौपदरीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला असला तरी महामार्ग ऐनकेन कारणाने समस्यांच्या विळख्यात अडकत आहे. भोस्ते घाटातील अवघड वळण अपघातांच्या दृष्टीने शापित बनले आहे. भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणच्या उड्डाणपुलावरही विशेषतः अवजड वाहतुकीच्या वाहनांना अपघात घडत आहेत. चौपदरीकरणातील मार्गावर भर रस्त्यात वाहने बंद पडत असल्याने वाहनचालकांची डोकेदुखी कायम आहे.
या समस्यांनी वाहनचालक त्रस्त असतानाच चौपदरीकरणातील मध्यभाग गवताने वेढला आहे.
एकीकडे चौपदरीकरणातील मध्यभागात ७० हजार वृक्षांची लागवड केल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग खात्याने केला होता. मात्र खवटीपासून परशुराम घाटापर्यंत चौपदरीकरणातील मध्यभागात वृक्षांचा थांगपत्त नसून मध्यभाग केवळ गवताने वेढला होता. यामुळे अपघातही घडत होते. याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची राष्ट्रीय महामार्ग खात्याने दखल घेत मध्यभागातील गवत कापण्याचे काम हाती घेतले आहे.
मंगळवारी भरणे येथील काळकाई मंदिरापासून काशिमठापर्यंत गवत कापण्याचे काम सुरू होते. यासाठी १० ते १२ कामगार तैनात करण्यात आहे आहेत. मध्यभागातील वाढलेले गवत कापण्याचे काम हाती घेण्यात आले आहे