खेड(प्रतिनिधी) एसटीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या बसमधून फरक न भरता मोफत पासची सेवा लागू करणे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांऐवजी १ वर्षाचा मोफत पास सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी एसटी संघटना गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. मात्र, अद्याप या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्वरित या मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते चंद्रकांत मोरे यांनी लेखी निवेदना द्वारे केली आहे
एसटी महामंडळामध्ये कार्यरत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना राज्यात आणि राज्याबाहेर धावणाऱ्या एसटी बसमधून मोफत प्रवास करण्यासाठी दोन महिन्यांचा पास मिळतो. तर, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांचा पास मिळतो. मात्र, या पासची मुदत वाढवावी, याबाबत एसटी संघटना गेल्या दोन वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्न करत आहेत. ११ सप्टेंबर २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये या मागण्यांबाबत
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी संबंधितांशी चर्चा करून निर्णय घ्यावा आणि आवश्यक तेथे प्रस्ताव संचालक मंडळापुढे सादर करावा, असे मान्य केले होते. मात्र अद्यापि हे प्रकरण तडीस नेण्यात आले नसल्याचे श्री मोरे यांनी म्हटले आहे