खेड लायन्स क्लबतर्फे ४ पासून क्रीडा महोत्सव

क्रिकेट, शरीरसौष्ठव, कबड्डी स्पर्धांचा समावेश, १२ जानेवारी पर्यंत महोत्सवाची धूम
खेड(प्रतिनिधी) खेड लायन्स क्लब ऑफ सिटीतर्फे ४ ते १२ जानेवारी दरम्यान तालुका क्रीडा संकुल मैदानात क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात क्रिकेट, शरीरसौष्ठव व मॅटवरील कबड्डी स्पर्धांचा समावेश असल्याची माहिती अध्यक्ष सुरेश चिकणे व माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१२ जानेवारीपर्यंत सलग ९ दिवस महोत्सवाची धूम रंगणार आहे. याचदरम्यान विविध सामाजिक उपक्रम
राबवून गरजूंना मदतीचा हातही देण्यात येणार आहे. ४ ते ७ जानेवारी दरम्यान प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी,पोलीस
तहसील कर्मचारी, प्रांत कार्यालय कर्मचारी व पत्रकार यांच्यात सायंकाळी ७ वा. क्रिकेटचे सामने होतील. स्पर्धेतील विजेत्यांसह उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर, सामनावीर यांनाही गौरवण्यात येणार आहे. ८ रोजी सायंकाळी ६ वा. शरीरसौष्ठव स्पर्धा होतील. विजेत्याला ‘लायन्स श्री २०२५ चा किताब देवून गौरवण्यात येईल. १० ते १२ जानेवारी दरम्यान जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मॅटवरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होतील.
याप्रसंगी कार्यक्रमप्रमुख ओंकार गोंदकर, राजा जोयसर, शैलेश धारिया, उपाध्यक्ष विनोद मोरे, खजिनदार प्रवीण पवार, पंकज शहा, निनाद गांधी आदी उपस्थित होते.