महावितरण कडून दखल नाहीच
माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप कवळकर यांच्या घराशेजारील विद्युत खांब धोकादायक स्थितीत आहे.विद्युत खांबाला भगदाड पडले असून जेमतेम तारांमुळे उभा राहिला आहे.ताराना आधार देण्याऐवजी,खांब तारांच्या आधारामुळेच उभा असल्याचे चित्र आहे.साध्या वाऱ्यामुळे देखील केव्हाही जमीनदोस्त होऊ शकतो अशी स्थिती असताना महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
ग्रामपंचायत सदस्य संदीप कवळकर यांनी सतत महावितरण च्या ही बाब निदर्शनास आणून देखील,महावितरण अद्याप दखल घेतली नसल्याचे श्री कवळकर यांनी सांगितले.सदर विद्युत खांब पडल्यास बाजूला घरे आहेत.शिवाय खांबा शेजारी मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत आहे.खांबा सोबत विद्युत भारित तारा जमिनीवर कोसळल्या तर भीषण आग लागू शकते अशी स्थिती आहे.या खांबा शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना मुठीत जीव घेऊन राहावे लागत आहे.
भीषण स्थितीत असलेला हा विद्युत खांब तात्काळ बदलावा अशी मागणी होत आहे.












