सावध व्हा.. युवकांनो जीवन अनमोल आहे
चिपळूण (वार्ताहर) : मद्यपान , अंमली पदार्थांचे व्यसन ही एक विकृती आहे . जिथं विकृती तिथं कशी टिकणार संस्कृती . सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं मूळ कारणच व्यसनाधिनता आहे. चोऱ्यामाऱ्या भांडण – तंटे , खून आणि महिलांवरील वाढते अत्याचार यांना व्यसनाधिनता कारणीभूत ठरत आहे . व्यसनामुळे अनेकांची कुंटूंब उध्वस्त होत आहेत . कर्जबाजारीपणा वाढतो आहे . तरुणांचे नाहक बळी जात आहेत . त्यामुळे व्यसनाच्या जहरी विळख्यातून अडकलेल्या तरुणाईला वीस बाहेर काढण्याची गरज असल्याचे मत शिव खुर्द येथील प्रकाश कुळे यांनी व्यक्त केले आहे.
समाजात सामाजिक जनजागृती करण्यासाठी सभा, वृत्तपत्रे, छोटे कार्यक्रम यातून श्री. कुळे जागृती करत आहेत.
कुठलेही व्यसन हे वाईटच असते. सध्या अंमली पदार्थांची भूख वाढतच आहे . मला काय करायचंय , कुणी ना कुणाला बोलायचं हे असचं चालायचं आणि गावाच गावपण हरवून बसायचं . या वाढत्या व्यसनाधिनतेला समाजही तितकाच जबाबदार आहे .
कोणत्याही धर्माचं तत्व मदयपान – अंमलीपदार्थ सेवन करू नये असचं सांगते. तरीही देशातील तरुणाची ताकद व्यसनापुढे का वाया जात आहे. “आताच बघा संपते एका वर्षांची गोष्ट.. त्याला पार्टी रंगते थर्टी फस्ट” . रात्रभर प्यायची बिअर आणि म्हणायचं हॅपी न्यू इअर . हे कसलं स्वागत खऱ्या अर्थाने वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सुख दुःखाचा सिंहावलोकन करण्याचा आहे. त्याला स्वरूप
आता लग्नसराई सुरु झाली . आयुष्यातील एक महत्वाचा संस्कार सोहळा . त्याच्या पूर्वसंध्येला हळदी पार्टी रंगते . डीजे च्या तालावर तरुणाई डोलते . लग्नाची वरात धड येत नाही कधी दारात . सुपुत्राच्या लग्नात लाखाची खाक करून अपवित्र कार्य करतो . आणि यजमानी फुशारकी मारतो . समाज राजरोसपणे पार्टीचा अस्वाद लुटतो . आता समारंभाला पार्टीचे स्वरूप आले बर्थडे पार्टी , थर्टीफस्ट पार्टी , हळदी पार्टी , मॅरेजपार्टी , मोंगा पार्टी. आनंद व्यक्त करायचा तर पार्टी झालीच पाहिजे . आनंद व्यक्त करणे प्रत्येकाचा हक्क आहे पण त्याचे स्वरूप बदलले याचे दुःख आहे.
या मोठ्यांच्या आनंदाचं निरीक्षण लहान करत असतात . याच भान असायला हव. या निरीक्षणातून चिल्लर पार्टीचा जन्म झाला याला जबाबदार कोण ? मद्याचं सेवन करायचं रिकाम्या बाटल्या , गुटख्याची रिकामी पाकिटे, विडी सिगारेटची थोटकं सर्वजनिक ठिकाणी फेकायची मग कुतुहलाने त्याची चव निष्पाप बालकांनी चाखली तर दोष कोणाचा ? लहान बालकांना दुकानावरून हे पदार्थ आणायला सांगणे कितपत योग्य आहे. बघावं तेव्हा तोंडात तंबाखू – गुटख्याचा चोबरा सार्वजनिक इमारतीचा कोपरा रंगतो तेव्हा संस्कार आणि नैतिकता लयास पावते. चांगल्या सवयीतून समाजाची संस्कारक्षम पिढी घडत असते . हि समाजिक जबाबदारी झटकून आपले खूप सामाजिक नुकसान होणार आहे .
गाव हा विश्वाचा नकाशा आहे. गावचं गावपण आणि शहाणपण टिकवायचं असेल तर प्रत्येकाने सजगपणे विचार करायला हवा नाहीतर एक दिवस ही दारूच गावाचा दारुण पराभव करेल . गावाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी तरुणाई या जहरी विळख्यातून वाचवायला हवी नाही, तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही .व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज आहे .










