कोकण रेल्वेचे स्लीपर डबे बनलेत जनरल !

तिकीट आरक्षित असूनही गाडीत शिरणेही मुश्किल; महिला मुले, वृद्ध प्रवाशांचे हाल

खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या व तुतारी एक्सप्रेस गाड्यांचे स्लीपर डबे जनरल डबे बनले आहेत. या डब्यांमध्ये वेटिंग लिस्ट वर असलेल्या प्रवाशांसह जनरल तिकीट असलेले प्रवाशांची घुसखोरी वाढल्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना गाडीत शिरणे मुश्किल झाले आहे.

रेल्वेच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या आरक्षित डब्यामध्ये वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना चढण्यास मनाई आहे. अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई अथवा त्यांना गाड्यांमधून उतरवण्यात येते. पण याची अंमलबजावणी कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये होतच नाही. त्यामुळे आगाऊ आरक्षण करून, आरामात प्रवास करायला मिळेल या अपेक्षित असलेल्या प्रवाशांचे अक्षरशः हाल होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी येथून रात्री ११ वाजता सुटणाऱ्या कोकणकन्या व दादर येथून मध्यरात्री १२.०५ वाजता सुटणाऱ्या तुतारी एक्सप्रेसच्या स्लीपर कोच डब्यामध्ये सुरुवातीपासूनच वेटिंग लिस्ट असलेल्या प्रवाशांसह जनरल डब्याची तिकीट काढलेले प्रवासी चढतात.

शौचालयाला जाण्याचे वांदे

मुंबई कोकण प्रवास ९ ते १० तासाचा त्यामुळे साहजिकच रात्री लघवीला जाणे आवश्यक असते. पण गर्दीमुळे शौचालयापर्यंत पोहोचणे तारेवरची कसरत असते. खाली बसलेल्या लोकांना तुडवत.. तुडवत.. कसे बसे शौचालयापर्यंत पोहोचल्यानंतर शौचालयाच्या दरवाज्यावरही अनेक प्रवासी बसलेले असल्यामुळे दरवाजा उघडणेही अशक्य होते. याचा सर्वाधिक त्रास वयोवृद्ध महिला व मधुमेही रुग्णांना होतो. त्यात शौचालयपर्यंत पोहचण्यासाठी खाली बसलेल्या प्रवाशांची बोलणीही ऐकावी लागतात.

दादर, ठाणे व पनवेलला डब्यातून टीसीही फिरतात. पण स्लीपरचा आरक्षण असलेल्या कोणीही उतरण्यास तयार होत नाही. प्रवाशांना डब्यामध्ये शिरता येत नाही. एक दोन प्रवाशांवर कारवाई करून हातात बॅगा घेऊन आपली सीट टीसीही निघून जातात. त्या मुळे स्लीपर डबे जनरल डबे बनल्याचे चित्र कायम आहे