उद्घाटनाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तर समारोपाला माजी केंद्रीय मंत्री खा. नारायणराव राणे, ना. उदय सामंत यांची उपस्थिती
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पताई पटवर्धन यांनी दिली माहिती
रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय रत्नागिरीच्या शताब्दी महोत्सव समारंभ एक जानेवारीपासून सुरू होत असून त्याचे उद्घाटन सोसायटीचे अध्यक्ष तथा केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होत आहे तर समारोप समारंभाला माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
ही माहिती रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, उपकार्याध्यक्ष विजय साखळकर, सहकार्यवाहक श्रीकांत दुधगीकर उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीमती पटवर्धन म्हणाल्या 1 जानेवारी 1925 या दिवशी केवळ रत्नागिरीच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात अवघ्या तीन मुलींना घेऊन कै. बाबुराव जोशी व कै मालतीबाई जोशी या दांपत्याने महिला विद्यालयाची स्थापना रत्नागिरीमध्ये केली. या विद्यालयाला 1 जानेवारी 2025 रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विद्यालयाचा शताब्दी महोत्सव समारंभ बुधवार दिनांक 1 व गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी विद्यालयाच्या रंगमंचावर संपन्न होत आहे.
एक जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन होणार असून त्यासाठी ना. श्रीपाद नाईक उपस्थित राहणार आहेत. तर समारोप समारंभ 2 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. याच वेळेला भव्य शोभायात्रेचाही आयोजन करण्यात आलं असल्याचं श्रीमती पटवर्धन यांनी सांगितलं.











