अटक चौघांमधील दोघीजणी गरोदर; रुग्णालयात दाखल तर दोघानिया पोलीस कोठडी
चोरी केलेल्या घरातील आणि रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फूटेजवरून पोलिसांनी गोवा गाठले
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथे मंगळवारी दुपारी कॉन फूड इंडस्ट्रीज जवळील घरात जबरदस्तीने घ्ाूसून मंगळसूत्र आणि अंगठी लांबवणार्या चार संशयित महिलांना ग्रामीण पोलिसांनी थिवीम गोव्यातून अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता या गुन्हायातील दोन महिला गरोदर असल्याने त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन महिलांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
संगिता बादल वागरी (55),चंद्रिका चरण वागरी (30) या दोन संशयित महिलांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अनिता उर्फ नितल विकास वागरी (34) आणि संजना सुनिल राठोड (30, सर्व रा.चाकण तळेगाव बायपास रोड एमआयडीसी झोपडपट्टी) या दोन महिला गरोदर असल्याने त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात कल्पना चंद्रशेखर भिसे (64,रा.एमआयडीसी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी 2 वा. सुमारास फिर्यादी ह्या आपल्या होत्या. त्यावेळी संशयित महिलांनी त्यांच्या घरामध्ये जबरदस्तीने घूसून बेडरुममधील कपाटाच्या ड्रॉव्हरमधील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी असा 40 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फिर्यादीच्या घरातील सीसीटिव्ही फूटेजची पाहणी करुन संशयित महिलांची माहिती घेतली. त्यानंतर त्या महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रत्नागिरी रल्वे स्टेशन परिसरातील सीसीटिव्ही फूटेजची पडताळणी केली असता त्यांना संशयित महिला या मांडवी एक्सप्रेसने प्लॅटफॉर्म 3 वरुन मडगावकडे निघून गेल्याचे निदर्शनास आले.
ग्रामीण पोलिसांनी रल्वे पोलिस प्रशासनाची मदत घेउन संशयित महिलांन अटक करण्यासाठी थिवीम रेल्वे स्टेशन गोवा येथील पोलिसांशी समन्वय साधून संशयित महिलांना तेथेच थांबवून ठेवले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी जाउन संशयित महिलांना अटक केली. या महिला चौकशीत सहकार्य करत नसून आपापसात आवाज चढवून,गोंधळ करत असून उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत.












