शृंगारतळीत तीन महिने अंधार

तीन महिन्याचे १ लाख ६८ हजार रूपये थकित

शृंगारतळी (वार्ताहर ) गुहागर- विजापूर रस्ता रुंदीकरणाच्या ठेकेदाराने तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीत पथदीप बसवले होते. मात्र ठेकेदाराने वीजकर थकवल्याने गेले ३ महिने शृंगारतळी अंधारात चाचपडत आहे. याविरोधात पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने तीव्र नाराजी व्यक्त करुन संबंधित ठेकेदाराला पत्र देऊन जाब विचारला आहे.
मनीषा कन्ट्रक्शनच्या ठेकेदाराने सुमारे ८ महिन्यांपूर्वी शृंगारतळी शहरात पथदीप बसवून परिसर प्रकाशमान केला. मात्र गेले ३ महिने पथदीप कर भरलेला नाही. एकूण १ लाख ६८ हजाराचे पथदीप कर थकीत आहे. त्यामुळे महावितरणच्या वसुली अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत विचारणा करुन पथदीप कर भरण्यास सांगितले होते.

 

मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने वीज खंडीत करण्यात आली होती. तरीही पथदीप कर न भरल्याने व कालावधीत वाढ होत असल्याने महावितरण कर्मचाऱ्यांनी येथील मीटर काढून कार्यालयात जमा केला आहे. पथदीपांचे मीटर मनीषा कन्ट्रक्शनच्या नावे आहे. रुंदीकरण होईपर्यंत देखभाल दुरुस्ती, पथदीप कर भरणे ठेकेदाराला बंधनकारक आहे असे असताना ठेकेदाराने पथदीप कर थकवून पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला अडचणीत आणले आहे. शिवाय नागरिक, प्रवासी, व्यापारी यांना अंधारात ठेवले आहे. शृंगारतळी ही तालुक्याची आर्थिक राजधानी मानली जाते. रात्री-अपरात्री येथे वर्दळ असते. सातत्याने चोरी होण्याच्या घटना, रात्री उशिरापर्यंत सुरु राहणारी बाजारपेठत पथदीप बंद असल्याने व्यापाऱ्यांसह प्रवासी, वाहनचालक यांची मोठी गैरसोय झाली आहे.