धडकेमुळे दुचाकीस्वार व सहप्रवासी महिला जखमी जखमी
फुणगुस : दुचाकी समोर अचानक बिबट्या आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वारासह अन्य एक महिला प्रवासी जखमी झाली. ही घटना आज बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास शास्त्रीपुल आंबेड -डिंगणी मुख्य रस्त्यावर घडली.
जंगल भाग सोडून गेले काही दिवस संगमेश्वर शहरासह आजूबाजूच्या गावात बिबट्या फिरत असून काहींना प्रत्यक्षात बिबट्याचे दर्शन झाल्याचेही बोलले जात आहे. तर सौरव रसाळ यांच्या घरा जवळ येऊन भटक्या कुत्र्यांची पिल्ले पळवून नेत असतानाचे दृश्य कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाले आहे. आज शास्त्रीपुल आंबेड -डिंगणी या नेहमीच वाहनवर्दळीने गजबलेल्या मुख्य रस्त्यावरच वाघाने आंबेड खुर्द येथील मंदार मोहन राहटे (वय वर्ष 26) व त्याच्या बरोबर दुचाकी वरून प्रवास करणारी प्राजक्ता संतोष चव्हाण (वय वर्ष 26 गाव कोळंबे) हे रेल्वे स्टेशन येथे जात असताना आंबेड मुख्य रस्त्यावरून भांडारवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी अचानक धावत आलेल्या वाघाने त्यांच्या दुचाकीला धडक देत तेथून पुन्हा जंगलच्या दिशेने पळ काढला.
अचानक चालत्या दुचाकी समोर बिबट्या येऊन दिलेल्या धडकेने दुचाकी रस्त्यावरून काही अंतर घासपट गेली आणि मंदार रहाटे व प्राजक्ता चव्हाण हे दोघेही जखमी झाले. या दोघांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.












